राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले. त्यानंतर आज म्हणजेच शनिवार ८ जुलै पासून नाशिक येथील येवल्यामधून त्यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातून शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. अशातच यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीतून फुटलेल्या गटावर टीका केली आहे.
(हेही वाचा – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजे विकासाचे ‘त्रिशूळ’ – देवेंद्र फडणवीस)
काय म्हणाले शरद पवार?
ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल? असं विचारलं असता शरद पवार यांनी हे उत्तर दिलं आहे. तसंच भुजबळांना आम्हीच येवलाची जागा लढवायला देऊन सेफ केलं होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात ७० च्या पुढे वय असलेली अनेक लोकं आहेत. मी व्यक्तिगत कोणाविषयी बोलू इच्छित नाही. पण १९७८ साली मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझा मोरारजी देसाई यांच्याशी संबंध यायचा. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांचे वय ८४ होते. ते दिवसातले किती तास काम करायचे याविषयी चर्चा न केलेली बरी. तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर चांगली कामं करायला तुम्हाला वय कधी अडथळा आणत नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community