सध्या दररोज कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. येत्या २-३ दिवसांत अशीच संख्या वाढेल आणि उच्चांक गाठेल, त्यानंतर ही संख्या कमी होत जाईल, अशी आशा आहे. म्हणून जनतेने दिलेले निर्बंध कटाक्षाने पाळावेत अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, असा अंतिम इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता रुग्ण संख्या कमीच!
सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अन्य राज्यांतील लोकसंख्येची तुलना करता महाराष्ट्रात जी रुग्ण संख्या ८० टक्के इतकीच आहे, अन्य राज्यात ती १२० टक्के इतकी आहे. दर हजारी प्रमाणे याचे गुणोत्तर काढून आपण हे बोलत आहोत, तसेच बंगालमध्ये निवडणूक सुरु आहे, गुजरातमध्ये आयपीएल खेळली जात आहे. त्या ठिकाणी गर्दी होते, नियम पळाले जात नाही, त्यावर का भाष्य केले जात नाही, असेही टोपे म्हणाले.
(हेही वाचा : शरद पवार, महाराष्ट्राची बेअब्रू वाचवा! असे का म्हणाले चंद्रकांत पाटील? )
६०० खासगी ठिकाणी लसीकरणाला मान्यता!
सध्या ६०० खासगी ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला मान्यता देण्यात येत आहे. राज्यात २,४०० प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होत आहे. देशभरात तातडीचे अँटिजेन टेस्ट केली जात आहे. महाराष्ट्रात मात्र आरटी-पीसीआर या चाचणीवर भर दिला जात आहे. ७५ टक्के या चाचण्या करण्यात येत आहे, असे राजेश टोपे म्हणाले. आतापर्यंत ४५ लाख नागरिकांना लस देण्यात आली असून आरोग्यसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेले ४५ वयापर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण येत्या ३ महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १८ वर्षांनंतरच्या पुढील घटकांना लस देण्यात येणार आहे, असेही टोपे म्हणाले.
२० खाटा असलेल्या रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्र!
केंद्राच्या नियमानुसार किमान १०० खाटा असलेल्या रुग्णालयांमध्येच लसीकरण केंद्र सुरु होत होते, मात्र राज्याच्या आग्रहामुळे आता २० खाटांच्या रुग्णालयातही लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सध्या राज्यात ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग या त्रिसूत्रीप्रमणे काम सुरु आहे, असेही टोपे म्हणाले.
Join Our WhatsApp Community