फडणवीसांचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार का? 

वर्षभराच्या कालावधीत ठाकरे सरकारवर एकामागोमाग एक गंभीर आरोप झाले आहेत आणि हे आरोपांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता सरकार अस्थिर बनले आहे. सरकारला वाचवण्यासाठी शरद पवारांची मात्र तारेवरची कसरत सुरु आहे. 

156

अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, सचिन वाझेंची अटक, परमवीर सिंग यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप यांसह राज्यात कोरोनग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढत चाललेली संख्या, ही तर मागील महिनाभरातील ठाकरे सरकारमागे लागलेली शुक्लकाष्ट आहेत, खरेतर सरकार सत्तेवर आल्यापासूनच हे सरकार अडीअडचणींना सामोरे जात आहे. याचा मागोवा घेतल्यास वर्षभरानंतर ठाकरे सरकार कमालीचे अस्थिर बनल्याचे दिसून येते. म्हणूनच महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार सध्या सरकार वाचवण्याचे शेवटचे प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ‘ठाकरे सरकार पाडण्याची गरज नाही, ते स्वतःच्या कर्माने कोसळेल’, हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत येत्या २ दिवसांत सत्य होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सरकार वाचवण्यासाठी पवारांची कसरत!

सध्या एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ज्येष्ठ नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. पवारांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने एटीएसला अधिक सक्रिय केले आहे. ज्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले, त्याच दिवसापासून अचानक एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात सक्रिय झाल्याचे दिसून आले, एटीएसने दोन जणांना अटकही केली. जयंत पाटील यांनी त्याचा आवर्जून उल्लेख केला. एटीएस या प्रकरणात वेगाने तपास करत आहे. या तापसांतर्गत एटीएस दोषींच्या जवळ येऊन पोहचली आहे. त्यामुळे देशमुखांचा राजीनामा घेण्याची गरज नाही, असे सांगून एक प्रकारे या प्रकरणात तपासाची स्वतंत्र कहाणी लिहून फोकस दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. यातही राष्ट्रवादीला किती यश मिळते हे पाहावे लागणार आहे.

वादातूनच झाली सरकारची स्थापना!

दरम्यान हे सरकार मुळातच वादाच्या पार्श्वभूमीवर उभे राहिले आहे. विधानसभेची निवडणूक सेना-भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी लढवली. निकाल लागल्यावर भाजप सर्वाधिक जागा जिंकून आला, पण बहुमत नव्हते, याचा फायदा घेत सेनेने मुख्यमंत्रीपदासाठी निकालानंतर युती तोडली आणि दोन्ही काँग्रेससोबत महाआघाडी बनवून सत्ता स्थापन केली. या सर्व प्रकाराने नुकसान सेनेचे झाले, आज जेव्हा वर्ष उलटले तेव्हा शिवसेना ना हिंदुत्ववादी राहिली ना सेक्युलर, जनमानसात शिवसेनेची स्वतंत्र ओळख पुसून गेली आहे.

(हेही वाचा : शरद पवार, महाराष्ट्राची बेअब्रू वाचवा! असे का म्हणाले चंद्रकांत पाटील? )

कोरोनाचा सरकाराला पहिला सेटबॅक!

सरकार स्थापन होवून जेमतेम ३-४ महिने उलटले नाही तोच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. लॉकडाऊनमुळे राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले, कधी नव्हे इतकी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना ती हाताळण्यासाठी प्रशासकीय कामाचा तसूभर अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तारेवरची कसरत करावी लागली. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, घरात बसून राज्याचा कारभार हाकतात, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. मुंबईत तर कोरोना रुग्नांचा उच्चांक गाठला होता. गेल्यावर्षी देशभरात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात होती, अशा प्रकारे कोरोना हा ठाकरे सरकारसाठी पहिला सेटबॅक ठरला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मागील दोन महिन्यांत राज्यात पुन्हा कोरोना रुग्नांची संख्या वाढली असून यंदाही देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रातच दिसून आली.

आत्महत्यांची प्रकरणे भोवली!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कमालीचा हलगर्जीपणा केला. पोलिसांनी त्याचा आकस्मिक मृत्यू, अशी नोंद केली. या प्रकरणात मुंबई पोलीस दुसऱ्या बाजूची शक्यता लक्षात घेत नव्हते. म्हणून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण हाती घेतले. पुढे त्याची लिंक बॉलिवूडच्या अमली पदार्थाशी निघाली. त्यामुळे मग अमली पदार्थ विरोधी पथकाने याची पाळेमुळे खोदली. मुंबईतील या धंद्यामधील अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करून पुन्हा मुंबई पोलिसांची पर्यायाने ठाकरे सरकारची निष्क्रियता उघड केली. त्यानंतर सुशांत सिंग यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा इमारतीवरून खाली कोसळून मृत्यू झाला, त्याआधी ती ज्या पार्टीत उपस्थित होती, त्यामध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते, असा आरोप झाला. त्यामुळेही ठाकरे सरकार अडचणीत आले.

जमीन खरेदीचा व्यवहार डोकेदुखीचा ठरला!

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गाव कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी 21 प्लॉट रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रविंद्र रायकर यांना विकले असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली, मात्र त्या जमिनीवरील नऊ बंगल्याचा उल्लेख टाळला, असा गंभीर आरोप केला, अशा प्रकारे थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरच हे गंभीर आरोप झाले.

(हेही वाचा : परमबीर यांचा अजून एक धक्का…)

सेना नेत्यांमागे ED चा ससेमिरा!

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टॉप ग्रुप सेक्युरिटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED कडे तक्रार केली होती. त्यानुसार सरनाईक यांच्यासह त्यांच्या मुलाची चौकशी झाली. पुढे सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या विरोधात ED कडे तक्रार दाखल केली. त्यामुळे वर्षा राऊत यांच्यामागे ED च्या चौकशीचा ससेमिरा लागला.

संजय राठोडांचा मंत्री पदावरून पायउतार!  

परळी येथील राहणारी पूजा चव्हाण या मुलीने पुण्यात आत्महत्या केली, त्यावेळी तिचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आल्याने शिवसेना अडचणीत आली होती. संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, ही ठाकरे सरकारची मोठी नाचक्की ठरली.

एनसीपीच्या धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप!   

राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेच्या बहिणीने बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते, त्यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याच वेळी त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याने मुंडेंवरील संकट टळले असले तरी एनसीपीच्या नेत्याचे सामाजिक स्तरावर अब्रूचे धिंडवडे निघाले.

(हेही वाचा : देशमुखांची विकेट पडणार, दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री होणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.