रविवार, ९ जुलैपासून भारतीय महिला संघ बांगलादेशविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघ बांगलादेशला गेला असून आजपासून मालिकेला प्रारंभ झाला आहे. महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेसाठी संधी मिळाली आहे. खरं तर बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातून अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मानधना यांनी कॅप घालून युवा खेळाडूंचे अभिनंदन केले.
आदिवासी घरातून यशाच्या शिखराकडे पावले टाकत असेलल्या मिन्नूला महिला प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये ३० लाख रूपये मिळाले होते. तिला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले. केरळमधील वायनाड येथील या २३ वर्षीय आदिवासी क्रिकेटपटूने भारतीय संघात मजल मारल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात मिन्नू मणीला ३० लाखांची बोली लागल्यानंतर तिने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले. मी माझ्या आयुष्यात ३० लाख रुपये कधीच पाहिले नाहीत. मला आताच्या घडीला कसे वाटते आहे याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे मिन्नूने सांगितले होते. वायनाड ते महिला प्रीमिअर लीग आणि आता भारतीय संघ हा प्रवास मिन्नू मणीसाठी सोपा नव्हता. मिन्नूचे वडील रोजंदारी करून आपल्या मुलीला साथ देत आहेत. मिन्नू १० वर्षांची असताना तिने भाताच्या शेतात आपल्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इयत्ता आठवीपासूनच खेळाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी ती इडापड्डी येथील सरकारी शाळेत शिकत होती. शाळेच्या शारीरिक शिक्षण शिक्षिका अलसम्मा बेबी यांनी प्रथम मिन्नूची प्रतिभा ओळखली आणि तिला वायनाड जिल्ह्याच्या १३ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी नेले. पण मिन्नूच्या वडिलांनी क्रिकेट खेळण्यास विरोध केला. कालांतराने मिन्नूच्या जिद्दीने वडिलांचे मन जिंकले आणि त्यांनी तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.
(हेही वाचा West Bengal : पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत ‘खूनी खेला’; 4 तासांत 18 हत्या)
Join Our WhatsApp Community