अमरनाथ यात्रा 1 जुलै रोजी सुरू झाली होती. परंतु पाऊस आणि भूस्खलनामुळे यात्रेकरूंना पंजतरणी आणि शेषनाग बेस कॅम्पवर थांबवण्यात आले होते. पण आता तीन दिवसांनंतर म्हणजेच रविवार, 9 जुलै रोजी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
वृत्तानुसार, अमरनाथ गुहेजवळ वातावरण चांगले झाल्याने अधिकाऱ्यांनी गुहेतील मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. ज्या यात्रेकरूंनी आधीच दर्शन घेतले आहे त्यांना बालटाल बेस कॅम्पवर परत जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, खोऱ्यात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 700 हून अधिक अमरनाथ यात्रेकरूंना लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील छावणीत आश्रय दिला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत झाला आहे. दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिराची 62 दिवसांची वार्षिक यात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू झाली आहे. ही यात्रा 31 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. यात्रा स्थगित केल्यामुळे अनेक यात्रेकरु अडकल्याची माहिती मिळत होती. पण आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आल्याने यात्रेकरुंना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community