दादर रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच याठिकाणचे ७ फेरीवाले कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी सर्व फेरीवाल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सात फेरीवाले पॉझिटिव्ह आढळून आले असून त्या सर्व बाधित रुग्णांना जवळच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी दादर फुल मार्केटमध्ये ६ जण कोरोनाबाधित निघाले होते.
६७ फेरीवाल्यांची चाचणी!
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मॉल्स, फेरीवाले, बस आगार, रेल्वे स्थानक आदी भागांमधील गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची रॅपिट अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दोन दिवसांपूर्वी दादरमधील मिनाताई ठाकरे फुलबाजारमधील विक्रेत्यांची चाचणी केली. यामध्ये परवानाधारक विक्रेत्यांपैकी कोणी बाधित आढळून आले नव्हते. परंतु हमाल आणि नोकर हे बाधित आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या शेजारी सेनापती बापट मार्गावरील केशवसूत उड्डाणपुलाच्या खालील कर्मचाऱ्यांच्या चौकीच्या जागेत फेरीवाल्यांची चाचणी करण्यात आली. एकूण ६७ जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये सात फेरीवाल्यांच्या चाचणी सकारात्मक अर्थात पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे या सातही फेरीवाल्यांना त्वरीत महापालिकेच्यावतीने संस्थात्मक विलगीकरणात अर्थात क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली आहे.
(हेही वाचा : फडणवीसांचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार का? )
जी उत्तर विभागांमध्ये १६८ नवीन रुग्ण!
दरम्यान, सोमवारी दिवसभरात दादर, माहिम आणि धारावी या जी उत्तर विभागांमध्ये एकूण १६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७१ रुग्ण माहिममध्ये आढळले. तर दादरमध्ये ५७ आणि धारावीमध्ये ४० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे माहिम आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तर अख्ख्या जगाचे लक्ष असलेल्या धारावीतही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. धारावीमध्ये रुग्णांनी चाळीशी गाठली असून एकप्रकारे धारावीसाठी ही धोक्याची सूचना असल्याचे बोलले जात आहे. धारावीमध्ये सध्या १८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर दादरमध्ये २९७ आणि माहिममध्ये ३७७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जी उत्तर विभागात एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ३९७ एवढी झाली आहे.
धारावी : आजचे रुग्ण (४०), एकूण रुग्ण (४,४४१)
दादर : आजचे रुग्ण (५७), एकूण रुग्ण (५,५०५)
माहिम : आजचे रुग्ण (७१), एकूण रुग्ण (५,४५१)
Join Our WhatsApp Community