पोलीस असल्याचे सांगून बड्या घरातील तरुणांचे अपहरण करून खंडण्या उकळणाऱ्या एका टोळीतील म्होरक्याला गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने अटक केली आहे. या टोळीने गेल्या आठवड्यात पश्चिम उपनगरातील वर्सोवा येथून एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर अंमली पदार्थाची कारवाई करण्याची भीती घालून त्याच्याकडे ५० लाख रुपयाची मागणी केली होती. या तरुणांकडून या टोळीने पाच लाख रुपये उकळून त्याला सोडले होते. गुन्हे शाखेने या टोळीचा माग काढत टोळीच्या प्रमुखाला गोरेगाव येथून अटक केली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारे स्टेशनरीचे व्यापारी यांचा २२ वर्षाच्या मुलाचे वर्सोवा येथील एका रेस्टोरेंट अँड बारमध्ये दोन दिवसांपूर्वी काही जणांनी पोलीस असल्याचे सांगून त्याचे अपहरण केले होते, त्यानंतर त्याच्यावर ड्रग्सची पोलीस कारवाई करण्याची भीती घालून कारवाई टाळण्यासाठी त्याच्याकडे ५० लाख रुपयाची खंडणी मागितली होती, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील या टोळीकडून देण्यात आली होती. या टोळीने या तरुणांच्या बँक खात्यावरून ५ लाख रुपये काढून त्याच्याजवळील मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लुटला व पोलीस तक्रार केल्यास जीवे ठार मारू अशी धमकी देऊन या तरुणाला सोडण्यात आले होते.
जीवे मारण्याच्या भीतीने या पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला होता, अखेर शनिवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देणे, अपहरण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, पोनि. सचिन पुराणिक, पोनि. दिपक पवार, सपोनि. उत्कर्ष वझे, सपोनि. महेंद्र पाटील, पोउपनि. स्नेहल पाटील पथकाने या टोळीचा शोध सुरु केला, दरम्यान या टोळीचा म्होरक्या दीपक जाधव हा गोरेगाव येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने गोरेगाव येथून दीपक जाधव याला अटक केली. या टोळीतील इतर ५ जण फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. ही टोळी मूळची बुलढाणा जिल्ह्यातील आहे, या टोळीवर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
(हेही वाचा – मुलुंड नानेपाडा नाल्यावरील पुलाची होणार पुनर्बांधणी: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रस्ताव मंजुरीला सात महिने उजाडले)
ही टोळी मुंबईतील बडे पब, डिस्को, बार अँड रेस्टोरेंटच्या बाहेर रात्रीच्या सुमारास उभे राहून आपले सावज हेरतात, एकदा बड्या घरातील तरुण येथून बाहेर पडल्यावर त्याला गाठायचे त्याला पोलीस असल्याचे सांगून त्याला चौकशीसाठी घेऊन जात असल्याचे सांगून त्याचे अपहरण करायचे, त्यानंतर त्यांना ड्रग्सच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्याच्याकडून लाखो रुपये उकळत होते अशी महिती पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community