Heavy Rain : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत ५६ जणांचा मृत्यू

197
Heavy Rain : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत ५६ जणांचा मृत्यू

यावर्षी देशात मान्सून (Heavy Rain) उशिराने दाखल झाला असून त्याने आता रौद्र रूप धारण केले आहे. देशातील अनेक ठिकाणी भूस्खलन, दरड कोसळणे, पूर यासारख्या घटना घडत आहेत. या मुसळधार पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाचा अंदाज घेता येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ७ राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ६ दिवसात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा –  पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलैपासून फ्रान्स दौऱ्यावर; ४५ हजार कोटी रुपयांचे करार होण्याची शक्यता)

हिमाचलमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. तेथे ३ दिवसांत १२ इंच पाऊस पडला, जो सामान्यपेक्षा १० पट जास्त आहे. तर भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान-मध्यप्रदेशासह २४ राज्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. त्याचवेळी, १२ जुलैपर्यंत हिमाचलमधील १२ पैकी १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुनेचे पाणी सोमवारी (१० जुलै) रात्री ८ वाजेपर्यंत पाणी २०५.७६ मीटरने वाहत होते. पूर आणि पावसाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासन आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचावकार्यात गुंतले आहेत.

येत्या २४ तासात देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार आणि झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.