शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसलाही भगदाड पडण्याची भीती वाटू लागली आहे. याच कारणामुळे काँग्रेस हायकमांडने आज राज्यांतील नेत्यांना दिल्लीत बोलावून पक्षाच्या आमदारांना सांभाळून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. महत्वाचे म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुटुंबवादाला कंटाळलेले नेते आणि आमदारांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे. काँग्रेसचेही आमदार आणि नेते भाजपची वाट धरू शकते, अशी भीती हायकमांडच्या मनात निर्माण झाली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांध यांनी आज महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करून त्यांचया मनात नेमके काय सुरू आहे याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांंनी आजच्या बैठकीत हजेरी लावली होती. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अलिकडे खूप होत आहे, हे येथे उल्लेखनीय.
दरम्यान, महाराष्ट्रातील बड्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना काँग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या घडत असलेल्या तमाम राजकीय घडामोडी आणि त्याचा लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे याची विस्तृत चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील सर्व मोठे नेते आणि प्रभारी या बैठकीला उपस्थित होते.
(हेही वाचा – साताऱ्याचा पार्थ ठरला जागतिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज)
वेणूगोपाल यांनी सांगितले की, हायकमांड आणि महाराष्ट्रातील नेत्यांमधील ही बैठक तब्बल चार तास चालली. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणूक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी बंडखोरी या मुद्यावर चर्चा झाली. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी राज्यांतील नेत्यांना आपसातील सर्व मतभेद विसरून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे. तर, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसला मजबूत करण्यासाठी राज्यात तीन वेगवेगळ्या मोहिमा राबविण्याचा निर्णय सुध्दा या बैठकीत घेण्यात आला. राज्यांतील सर्व मोठ्या नेत्यांनी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेणे, सप्टेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या नेत्याच्या अध्यक्षतेखाली पदयात्रा काढणे आणि नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांत राज्यांत बस यात्रा काढणे असेही आजच्या बैठकीत ठरले.
भारतीय जनता पक्ष सत्ता मिळविण्यासाठी ईडी आणि पैश्याचा वापर करून विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब लोकांच्या लक्षात आली आहे आणि जनता येत्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही वेणूगोपाल यावेळी म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर काँग्रेसने प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. अशात, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करायचा की नाही? आणि करायचा झाला तर कधी करायचा? या मुद्यांवरही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community