पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि त्यांच्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात वातानुकूलित यंत्र बसविण्याची परवानगी असताना मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी यांच्या कार्यालयात वातानुकूलित यंत्रे बसविण्यात आलेली आहेत. बसविण्यात आलेली ही वातानुकूलित यंत्रे बेकायदेशीर आहेत, ती काढण्याचा आदेश राज्याचे पोलीस महासंचालक यांनी एप्रिल महिन्यात लेखी सूचना दिलेली असतांना देखील अद्याप पोलीस ठाण्यातील वातानुकूलित यंत्रे काढण्यात आलेली नाहीत. विजेचा होणारा अतिवापर थांबविण्यासाठी वातानुकूलित यंत्र काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत ४ सायबर पोलीस ठाण्यासह ९८ पोलीस ठाणी, गुन्हे शाखेची वेगवेगळी १६ युनिट तसेच विशेष शाखेचे वेगवेगळी युनिट आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या बिट चौकी आहेत. या सर्व ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या विजेची बिले गृह विभागाकडून भरली जातात, प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रत्येक महिन्याचे सरासरी विजेचे बिल २५ ते ३० हजार एवढ्या रकमेपर्यंत जाते. एकट्या मुंबईतील पोलीस ठाण्यांचे विजेचे महिन्याच्या बिलाची रक्कम जवळपास ३ कोटींच्या घरात जाते. दरवर्षी मुंबई पोलीस दलाच्या विजेचा बिलाचा भार सरकारी तिजोरीवर पडत असला तरी हा पैसा सर्वसामान्यांच्या करातून सरकारी तिजोरीत जमा होतो.
मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच काही पोलीस निरीक्षक यांच्या कक्षात, गुन्हे शाखा युनिटच्या प्रभारी अधिकारी वातानुकूलित यंत्रे अधिकारी यांनी स्वखर्चानी बसवली आहे. वातानुकूलित यंत्र बसविण्यासाठी कुठलीही सरकारी आर्थिक तरतूद नाही किंवा वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी परवानगी नसतांना देखील अधिकारी यांनी आपल्या सोयीनुसार स्वतःच्या कक्षात ए.सी (वातानुकूलित यंत्र) बसवली आहेत. अधिकारी यांच्या कक्षात असलेली ए.सी ही यंत्रणा २४ तासात किमान १२ तास सुरू असल्यामुळे पोलीस ठाण्याला प्रत्येक महिन्याला येणाऱ्या बिलात त्याचा परिणाम दिसून येतो.
(हेही वाचा international population day : ‘या’ कारणासाठी साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन)
याबाबत अनेक वेळा अनेकांनी ही बाब वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिलेली आहे, याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये छापून आल्यामुळे अखेर राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी कक्षात बसविण्यात आलेले वातानुकूलित यंत्रे गैरकायदेशीर ठरवत ते काढून टाकण्याची लेखी सूचना मुंबई पोलीस आयुक्त यांना २८ एप्रिल २०२३ रोजी दिली होती. या सुचनेत पोलीस ठाणे, बिट चौक्या, गुन्हे शाखेचे युनिट या ठिकाणी असलेली ए.सी हे बेकायदेशीर ठरवून ते काढण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस आयुक्त यांना योग्य कारवाई करून राज्य सरकारच्या मा. महालेखाकार (लेखापरीक्षा) नागपूर यांना परस्पर कळवावे असे लेखी सुचनेत म्हटले आहे. पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या या लेखी सूचनेला तीन महिने उलटत आले परंतु याबाबत मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसून नाही. पोलीस ठाण्यातील ए.सी ही यंत्रे काढण्यात आलेली नाही, काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे या सुचनेबाबत चौकशी केली असता आम्हाला असा कुठलाही आदेश मिळालेला नाही असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community