लाखो प्रवाशांसाठी लाईफलाईन असलेली मुंबई लोकल १७ वर्षांपूर्वी, म्हणजेच ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोटामुळे हादरून गेली होती. सकाळी आणि संध्याकाळची वेळ ही मुंबई लोकलच्या वर्दळीची असते. त्या दिवशी देखील अनेक प्रवासी याच वर्दळीतून प्रवास करत होते. या बॉम्बस्फोटात निष्पाप २०९ मुंबईकरांनी त्यांचे प्राण गमावले होते तर सातशे पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली आणि मीरा रोड या स्थानकांवर एक पाठोपाठ एक असे सात स्फोट तेव्हा झाले होते.
(हेही वाचा – नाशिक : सप्तश्रृंगी गड घाटात बसचा अपघात; एकाचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी)
मंगळवार ११ जुलै रोजी या घटनेला १७ वर्षे पूर्ण झाली. तरीदेखील या खटल्याच्या न्यायाची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा कनिष्ठ न्यायालयाने निकाल देऊन पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या सुनावणीला आठ वर्षे पूर्ण झाली असली तरीही या पाच आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्याची मागणी करणाऱ्या सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयात अजूनही सुनावणी सरू झालेली नाही.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयानंतर फाशीची शिक्षा झालेल्या पाच जणांनी उच्च न्यायालयात अपिल केले, तर त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे राज्य सरकारने अर्ज दाखल केला. त्यानंतर हा विषय आतापर्यंत नऊ वेगवेगळ्या खंडपीठांसमोर सुनावणीसाठी गेला. मात्र, अंतिम सुनावणी सुरू होऊ शकली नाही. नोव्हेंबर – २०२२मध्ये न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने याप्रश्नी सुनावणी घेण्यास तांत्रिक कारणावरून नकार दिला. त्यानंतर अद्याप हा विषय अन्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आला नाही. त्यामुळे फाशीच्या शिक्षेवरील शिक्कामोर्तब प्रलंबितच राहिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community