रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असून, त्यांनी 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेट संदर्भात केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे नवाब मलिक म्हणाले. एवढेच नाही तर रश्मी शुक्ला यांना लोकांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्याची सवय लागली होती. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारने शिक्षा म्हणून त्यांना थेट बढती न देता त्यांच्यासाठी वेगळ्या पदाची निर्मीती केल्याचे मलिक म्हणाले.
३० लोकांचे फोन टॅप होत होते!
फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि पोलीस बदलीची नियमावली माहिती असताना खोटा रिपोर्ट देण्यात आला, त्याच्या आधारे सरकारला बदनाम करण्याचे कट कारस्थान करत आहेत. रश्मी शुक्लांनी परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले. कोणतीही परवानगी न घेता त्या ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. हा गुन्हा आहे. ज्या अहवालाचा उल्लेख फडणवीस करत आहेत त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग सुरु होते. तसेच उल्लेख झालेल्या ८० टक्के बदल्या झालेल्या नाहीत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
(हेही वाचा : फडणवीस म्हणाले, पवारांना दिली चुकीची माहिती! देशमुख क्वारंटाईन नव्हते तर…)
म्हणून सुरू आहे खटाटोप!
फडणवीस हे ‘आपण रिपोर्ट घेऊन केंद्रीय गृह सचिवांकडे जाणार’, असे सांगत आहेत, याचा अर्थ बदल्या झालेल्या नाहीत. फडणवीस, त्यांची सत्ता गेल्यानंतर सरकार एक महिन्यात जाईल, दोन महिन्यात जाईल, असे सांगत होते. आमदार फुटतील असा दावा करत होते. सरकार पाडता आले नाही, म्हणून बदनामी करण्याचे काम भाजप आणि फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. आज ते उघडे पडले असून, दिलेली सर्व माहिती खोटी होती, असे नवाब मलिक म्हणाले.
तसा कोणताही पुरावा नाही!
सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी माझ्यावर उद्धव ठाकरेंचा दबाव होता, असा दावा फडणवीसांनी केली. आपण यासाठी कायदेशीर सल्ला घेतल्याचेही ते म्हणाले. पण असा कोणताही कागद मंत्रालयात नाही. याचा अर्थ ते दिशाभूल करत होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने जनतेला माहिती देण्याचे काम केले आहे. त्यांनी शरद पवार चुकीची माहिती देत असल्याचा उल्लेख केला. फडणवीसांनी उल्लेख केल्यानंतर गृहमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा केला होता. मी देखील खुलासा केला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री यांच्या हालचालींसंबंधी त्यांनी काही पोलीस रेकॉर्ड सादर केले. यावेळी त्यांनी याबाबत नक्की माहिती नसल्याचे सांगितले. याचा अर्थ कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. अनिल देशमुख नागपूर येथे हॉस्पिटमध्ये दाखल होते. डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली नव्हती. काही पत्रकार रुग्णालयाच्या गेटवर प्रश्न विचारत होते, तेव्हा त्यांनी तिथे खुर्चीवर बसून उत्तरे दिली. ते नागपुरात होम क्वारंटाईन होते, असे आम्ही कधीच सांगितले नाही. ते मुंबईत होम क्वारंटाइन होते हे स्पष्ट केले होते. डिस्चार्ज झाल्यानंतर खासगी विमानाने मुंबईला आल्यानंतर शासकीय निवासस्थानी २७ तारखेपर्यंत कोणतीही हालचाल नव्हती. फडणवीसांनी सांगितले तिथे ते गेले नव्हते. फक्त व्यायामासाठी मैदानात जात होते, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. फडणवीस लोकांना भ्रमित करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
Join Our WhatsApp Community