दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान एलिव्हेटेड रोड बनवण्याबाबत आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रस्ता मुंबई महापालिका बांधणार आहे. या प्रकल्पासाठी एल ऍण्ड टी, जे. कुमार आणि एफ कॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. सर्वात कमी बोली सादर करणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात येईल. या प्रकल्पाची किंमत सुमारे तीन हजार कोटी आहे. दहिसर-मीरा-भाईंदर एलिव्हेटेड लिंक २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई क्षेत्रातील रस्ते बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.
मुंबई महापालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत निविदा भरण्याची मुदत होती. तीनही कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. या प्रकल्पामुळे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. दहिसर-मीरा भाईंदर लिंक पूर्ण झाल्यास मुंबईहून मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. विना अडथळा जलद प्रवासासाठी हे रस्ते बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दहिसर पश्चिमेतील कंदेरपाडा मेट्रो स्टेशन ते भाईंदर पश्चिमेतील उत्तन असा हा मार्ग असेल.
दहिसर-भाईंदर उन्नत रस्ता पाच किमी लांब आणि ४५ मीटर रुंद असेल. हा मार्ग प्रत्येकी चार पदरी असणार आहे. हा लिंक रोड तयार झाल्यानंतर दहिसर-मीरा भाईंदर हे अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर अंतर कमी झाल्याने पेट्रोलचीही बचत होणार आहे. रस्ता ५ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद असेल. नरिमन पॉइंट ते दहिसर असा हा कोस्टल रोड असेल जो या एलिव्हेटेड रोडला जोडला जाईल. कोस्टल रोड ते वरळी सी लिंक आणि सी लिंक ते वांद्रे, वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते कांदिवली – दहिसर तेथून तो एलिव्हेटेड रोडला जोडला जाईल. दहिसर ते भाईंदर हा सध्याचा प्रवास ४५ ते ५० मिनिटांचा आहे. मात्र या मार्गाने १५ ते २० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे दहिसर चेक पॉइंटवरील वाहनांची गर्दी ३५ टक्क्यांनी कमी होणार आहे.
(हेही वाचा झारखंड : ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत टिकली लावली म्हणून विद्यार्थीनीला मारहाण; मुलीची आत्महत्या)
Join Our WhatsApp Community