देशातील युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरा इतिहास माहित नाही. मलाही नव्हता. परंतु, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाच्या निमित्ताने मी जेव्हा सावरकर अभ्यासले, तेव्हा या महान क्रांतिकारकाविषयीचा आदर कैकपटीने वाढला. माझ्या जीवनात सावरकर येण्याने माझे जगणेच बदलले, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुड्डा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधताना दिली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या हिंदी चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा हे सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांची भेट घेण्यासाठी बुधवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दाखल झाले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते. गौरव पवार यांनी या भेटीचे नियोजन केले होते. रणदीप हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्टुडिओ आणि रायफल शुटींग रेंजला भेट दिली. यावेळी त्यांनी नेमबाजीचाही आनंद लुटला. सावरकर स्मारकात इतके सारे उपक्रम राबविले जातात, याविषयी मी अनभिज्ञ होतो. परंतु, आज प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेऊन मी आनंदी झालो आहे, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा झारखंड : ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत टिकली लावली म्हणून विद्यार्थीनीला मारहाण; मुलीची आत्महत्या)
यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधताना हुड्डा म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी मी भरपूर मेहनत घेतली. सावरकरांनी लिहिलेली बहुतांश पुस्तके वाचली. सावरकरांविषयीचे व्हिडिओ पाहिले. सावरकरांची शरीरयष्टी, वेषभूषा याचा बारकाईने अभ्यास केला. पडद्यावर दिसणारा रणदीप हुड्डा नसून साक्षात सावरकर आहेत, असा भास प्रेक्षकांना व्हावा यासाठी २६ किलो वजन कमी केले. वर्षभर डायटवर विशेष भर दिला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी युवा पिढीला फारशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांपर्यंत सावरकर पोहोचावेत, यावर आमचा विशेष भर राहील. जेणेकरून सावकरांच्या विचारांतून युवकांना प्रेरणा मिळेल, देशभक्तीची ज्योत त्यांच्या मनात कायम तेवत राहील, असेही हुड्डा म्हणाले.
रणजित सावरकर यांना भेटून आनंद झाला!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांना भेटून अतिशय आनंद झाला. माझ्या सिनेमाविषयी त्यांना माहिती दिली. त्यांनी सावरकरांच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांची अतिशय कमी वेळात माहिती दिली. या चित्रपटात काय असावे, कशावर भर द्यावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले, असे रणदीप हुड्डा यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community