राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे सद्या पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून गुरुवारी महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहील तर उत्तर आणि पूर्व विदर्भातील काही भाग पुढील एक ते दोन तासांमध्ये चांगला पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाची जोरदार सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर रोखलेल्या पेरण्या देखील पुन्हा सुरू झालेल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासांमध्ये जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असेही हवामान खात्याकडून सूचित करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पुढील तीन ते चार तासांत ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, पालघर, रायगड आणि कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाट भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस होईल, अशीही माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 13 जुलै रोजी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community