Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ

209

उद्धव ठाकरेंनी नुकतंच पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी भाषण करून हे सांगितले की पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने फसवले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असे म्हणत २०१९ ला काय घडले तो घटनाक्रम त्यांनी कथन केले. तसेच आपण धर्मानेच वागतो आहोत असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

२०१९ ला नेमके काय झाले?

२०१९ ला काय झाले? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आले होते. हे मी पु्न्हा सांगतो आहे पण अलिकडच्या काळात काही लोक शपथाही खोट्या घेत आहेत. किमान पोहरा देवीला जाऊन शपथ घेतली. पण मनात त्यांनी माफी मागितली असेल आणि निश्चितपणे देवी त्यांना माफ करेल. मी आज पुन्हा सांगतोय, युतीची बोलणी सुरु होती. ती सुरु असताना एका रात्री सन्माननीय उद्धव ठाकरेंनी सांगितले की हे सगळे जरी बरोबर असले तरीही मी दोन दिवसांपूर्वी अमितभाईंशी बोललो होतो. मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. मी म्हटले मला हे सांगण्यात आलेले नाही. तेव्हा रात्री एक वाजला होता. अमितभाईंना मी फोन केला, त्यांना सांगितले की उद्धवजी म्हणत आहेत तुमच्याशी त्यांचं बोलणे झाले आहे आणि ते म्हणत आहेत सीट वगैरे ठीक आहे पण मुख्यमंत्रीपद हवे आहे. मी कॉन्फिडंट नाही तुम्ही सांगा काय करायचे. त्यावेळी अमितभाई म्हणाले मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात वर्षानुवर्षे आपला फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीच तडजोड होणार नाही. काही खाती जास्त हवी ती देऊ. मंत्रिपदं जास्त देऊ पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही. हे होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलणी थांबवा आणि नंतर काय करायचं ते बघू. ते मी उद्धवजींना सांगितलं की मी अमितभाईंशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्रीपद वाटता येणार नाही. त्यावेळी मला उद्धव ठाकरे म्हणाले हे होणार नसेल तर युती करणं कठीण आहे. ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेलो आणि सगळा संवाद संपला.

तीन दिवसांनी काय घडले?

तीन दिवसांनी एक मध्यस्थ माझ्याकडे आले, त्यावर ते म्हणाले की उद्धव ठाकरेंची पुन्हा चर्चेची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायचं असेल तरीही अट तीच आहे. त्यावर ते म्हणाले की त्यांनी आग्रह सोडला आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की पालघरची जागा जी आपण जिंकलो होतो, ती आम्हाला हवी. पालघरची जागा दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यावेळी मला नेते असं म्हणाले की एखाद्या जागेसाठी युती तोडणं योग्य नाही. आम्ही बसलो, मुख्यमंत्रीपदाचा विषय सील झाला. पालघरची जागा त्यांना दिली. त्यानंतर युती झाली आणि मी पुन्हा सांगतो की ज्या बाळासाहेबांच्या खोलीविषयी ते वारंवार सांगतात त्याच खोलीत उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मी होतो. काही काळ आधी ते बसले होते. मला बोलवण्यात आलं सगळ्या गोष्टी दूर झाल्या आहेत आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की पत्रकार परिषदेत तू एकट्याने बोलायचं आम्ही बोलणार नाही. मी मराठीत काय बोलणार आहे ते बोलून दाखवलं. हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर वहिनी आल्या (रश्मी ठाकरे), त्यांच्यासमोरही बोलून दाखवलं. अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे. मी पुन्हा वहिनींसमोर म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच पत्रकार परिषदेत बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे शब्द होते की मी खूप टोकाचं बोलून गेलो आहे, आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला. त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो आणि ती पत्रकार परिषद संपली.

२०१९ च्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस होणार होता उल्लेख

त्यानंतरच्या प्रत्येक सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढतो आहे, आपल्याला मुख्यमंत्री फडणवीसांना बनवायचं आहे असं अनेकदा सांगितलं. निवडणूक झाल्यानंतर जसं लक्षात आलं की नंबरगेम सांगतो की इकडे तिकडे केलं तर गणित जमू शकतं. मी अधिक खोलात जात नाही. आपण त्यावेळी गाफील राहिलो होतो. प्रेमाने विश्वास ठेवला होता. नंबरगेम झाल्यावर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात जाहीर केलं की आमच्यासाठी सगळे दरवाजे खुले आहेत. त्यानंतर काय झालं सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर सात-आठ दिवसांनी काय झालं, राष्ट्रवादीची ऑफर कशी आली? हे सगळं अजित पवारांनी सांगितलं. मी जे काही केलं होतं ते ठरवून आणि सगळ्यांशी बोलून केलं होतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.