मुंबईत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी नागरिकांनाच या लसीकरणाचा लाभ घेता येत आहे. पण कोरोनाची लस ही अपंग, दिव्यांग व आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींना देण्याची मागणी भाजपचे नगरसेवक अनिष मकवानी यांनी केली आहे. यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांमध्ये मोबाईल व्हॅन व रुग्णवाहिका तैनात करण्यात यावी, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
आयुक्तांना दिले निवेदन
मुंबईमध्ये महापालिका, सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची केंद्र सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ९ लाख ०२ हजार ७७ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये कोविशिल्डची लस ८ लाख ४४ हजार ३९८ जणांना तर कोव्हॅक्सिनची लस ५७ हजार६७९ नागरिकांना देण्यात आली आहे. तर सोमवारी एकूण ४२ हजार ४२० नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अजूनही गरजू व्यक्तींना लस मिळत नाही. समाजात आज अनेक रुग्ण हे अंथरुणाला खिळलेले आहेत. तसेच शारीरिक विकलांग असलेल्या दिव्यांगांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या लोकांना लसीकरणाी गरज असून, यासाठी २४ विभाग कार्यालयांमध्ये मोबाईल व्हॅन तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून या सर्वांना घरपोच लसीकरणाची मोहीम राबवता येईल, असे अनिष मकवानी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(हेही वाचाः कोविशिल्ड लस घेताय? मग आता आरोग्य मंत्रालयाचे नवीन निर्देशही वाचा…)
हेल्पलाइन व्यवस्थेची मागणी
समाजाचा घटक असलेल्या अशा दुर्बल आणि गरजू व्यक्तींना महापालिकेच्या कोविन अॅप्लिकेशन व महापालिकेच्या इतर अन्य अॅप्लिकेशमध्ये माहिती व मदत मिळवण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी आणि व्यक्तींसाठी हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः केंद्र सरकारचा मोठा निर्णय… आता या वयोगटातील लोकांना सुद्धा मिळणार ‘लस’!)
Join Our WhatsApp Community