Mumbai fire brigade : मुंबईतील अरुंद गल्लीतही शिरणार अग्निशमन दलाचे वाहन; दोन महिने विलंबानंतर केवळ चार वाहनेच दाखल

191

मुंबई महानगरातील दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते व गल्ली, जास्त वाहतूक कोंडीचे मार्ग इत्यादी ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्याप्रसंगी जलद प्रतिसादासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे शीघ्र प्रतिसाद वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तेथे त्वरित मदत पोहोचविता यावी या हेतूने मुंबई अग्निशमन दलात २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. ही वाहने मे २०२३मध्ये ताफ्यात दाखल व्हायला हवी होती, परंतु ही वाहने दोन महिने उशिराने ताफ्यात दाखल झाली असून केवळ चार ठिकाणीच ही क्युआरव्ही दाखल झाल्या आहेत. उर्वरीत १८ ठिकाणी या वाहनांचा ताफा दाखल व्हायला लागणार अधिक काही महिने.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र आंबुलगेकर यांच्या देखरेखीखाली मुंबई अग्निशमन दलाने नुकताच २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा आपल्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महानगरपालिकेच्या चार प्रशासकीय विभागांत ही वाहने दाखल झाली आहेत. अग्निशमन दलात एरव्ही वापरण्यात येणाऱ्या मोठ्या वाहनांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या क्यूआरव्ही वाहनांचा आकार लहान आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे शक्य होणार आहे. मुंबई महानगरात लोकसंख्येच्या तुलनेत जागेची टंचाई असल्याने काही परिसरांत कमी जागेत नागरिक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येतात. आता या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने आपल्या ताफ्यात २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा ताफा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात २४ प्रशासकीय विभाग आहेत. मात्र यातील ‘डी’ आणि ‘ई’ विभाग हे मुख्य अग्निशमन केंद्राजवळ असल्याने हे दोन विभाग वगळून इतर २२ विभागांसाठी ही वाहने सज्ज राहणार आहेत. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ही २२ वाहने अग्निशमन विभागाकडे आली आहेत. लवकरच ही वाहने प्रत्येक विभागासाठी नेमून कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ)

सध्या टागोर नगर (गोदरेज कंपाऊंड, विक्रोळी), महानगरपालिकेचे नागरी प्रशिक्षण केंद्र (बोरिवली), लोढा फ्लोरेंजा इमारत (गोरेगाव), लोढा पार्क इमारत (जी दक्षिण) येथे ही वाहने सज्ज आहेत. उर्वरित १८ विभागातही लवकरच ‘क्यूआरव्ही’ पोहोचणार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयान प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, एखाद्या आगीच्या ठिकाणी व इतर आपत्कालिन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाने १० मिनिटांच्या आत प्रतिसाद देणे आवश्यक आहे. परंतु सध्या उपलब्ध अग्निशमन केंद्राच्या संख्येमुळे हे उद्दिष्टये साध्य होत नसल्यामुळे महापालिकेच्या २२ विभाग कार्यालयांमध्ये जलद प्रतिसाद वाहने, प्रशिक्षित मनुष्यबळासह २४ बाय ७ याप्रकारे ३६५ दिवस उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी २२ वाहनांची खरेदी आणि प्रशिक्षित जवानांच्या मनुष्यबळासह पुरवठा करण्यासाठी आर्यन पंप्स एण्ड एन्वायरो सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सुमारे १८१ कोटी रुपये खरेदी करण्यात आली असून यासर्व वाहनांचा ताफा मनुष्यबळासह मे २०२३पर्यंत ही सर्व अग्निशमन वाहने विभाग कार्यालयांमध्ये तैनात केली जाणार होती.

असे आहे ‘क्यूआरव्ही’

सध्या मुंबई अग्निशमन दलाकडे १९ मिनी फायर स्टेशनसाठी १९ ‘क्यूआरव्ही’ आहेत. आता त्यात आणखी २२ वाहनांची भर पडणार आहे. त्यामुळे साहजिकच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होणार आहे. या वाहनांमध्ये ५०० लिटर पाणी, रेस्क्यू टूल्स उपलब्ध आहेत. चालक, सुपरवायझर आणि दोन फायरमन असे चौघे जण या वाहनासोबत घटनास्थळी पोहोचणार आहेत. हे चारही जवान महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथून किंव्हा शासनमान्य संस्थांकडून प्रशिक्षण घेतलेले असतील.

तात्काळ मिळणार मदत

ही वाहने अरुंद परिसरांमध्ये सहज पोहोचून नागरिकांची मदत करू शकतील. आपत्कालीन मदतीचा संदेश मिळताच अत्यंत कमी वेळेत ही वाहने घटनास्थळी पोहोचतील, म्हणजे कमीत कमी रिस्पॉन्स टाइम असेल. घटनास्थळी ही वाहने पोहोचल्यानंतर तेथील परिस्थितीचा अंदाज घेवून आणखी मदत हवी असल्यास त्याबाबत मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधणार आहेत. तसेच पक्षी अडकणे, वाहनांमधून तेल रस्त्यावर सांडणे, शॉर्ट सर्किट अशा घटनांवर ‘क्यूआरव्ही’ वाहन आणि त्यांचे पथक नियंत्रण मिळविणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.