हिंदुस्थान पोस्ट इम्पॅक्ट
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ आता हरिश्चंद्र माणिक पाटील मार्गांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांचेही काम निकृष्ट असल्याचे हिंदुस्थान पोस्टने निदर्शनास आणल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अभियंत्यांनी तडे पडलेल्या भागांची तपासणी केली असून हे तडे किती खोलवर याची माहिती घेतली. त्यामुळे ज्या पट्टयात खोलवर तडे पडल्याचे आणि भविष्यात रस्त्याला धोका निर्माण होईल असा भाग तोडून टाकण्यात आला आहे, त्यामुळे खोलवर तडे दिसलेला भाग तोडून आता नव्याने बांधून देण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदारामार्फत सुरु आहे.
दादर पश्चिम येथील रानडे मार्गाला जोडून जाणाऱ्या सेनापती बापट पुतळ्याशेजारील हरिश्चंद्र पाटील मार्गांच्या सिमेंट काँक्रिटचे काम महापालिकेने हाती घेतले. रस्त्यांच्या निम्म्या भागाचे अर्थात एमटीएनएलपर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम पावसाळा सुरु झाल्याने वापरण्यास सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते. परंतु अर्धवट रस्त्यांचे काम सुस्थितीत करून दिले नव्हते तसेच ज्या भागाचे सिमेंटीकरण केलेल्या त्यातील काही पट्टयांमध्ये अनेक ठिकाणी चिरा तथा भेगा पडलेल्या पहायला मिळत होत्या. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून लोकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु या रस्त्यांवरच अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या रस्ते विभागाने या संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
त्यानुसार उपायुक्त (पायाभूत सुविधा), रस्ते प्रमुख अभियंता यांच्या निर्देशानुसार उपप्रमुख अभियंता (शहर विभाग) आणि कार्यकारी अभियंता तसेच जी उत्तर विभागातील रस्ते अभियंता यांनी या अर्धवट रस्त्यांवरील भाग सुस्थितीत करून घेतला. तसेच भेगा पडलेल्या भागांचे नमुने घेऊन किती खोलपर्यंत या भेगा पसरल्या आहेत हे तपासले. यामध्ये रस्ते बांधकाम निकषानुसार बांधकामाच्या एक तृतीयांश खोलवर जर या भेगा दिसत असतील तर त्याठिकाणी पुन्हा बांधकाम करणे आवश्यक आहे, त्यानुसार एका पट्ट्यातील बांधकाम तोडून त्याचे काम संबंधित लँडमार्क कार्पोरेशन कंपनीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. पावसाने उघडीप घेतल्याने तातडीने ते तोडण्यात आले असून जेणेकरून हे बांधकाम झाल्याने चांगल्याप्रकारे पाणी या सिमेंट बांधकामाला मिळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – माजी शिक्षिका चालवत होती ड्रग्स तस्करीचे रॅकेट, दोन नायजेरियनसह सात जणांना अटक)
विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांनी हे बांधकाम तोडून नव्याने बांधण्यात येत असल्याने महापालिकेचे तसेच संबंधित अभियंत्यांचे आभार मानले आहे. काम योग्य प्रकारे न झाल्यास ते त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा करून घेणे याला सुपरविजन म्हणतात आणि महापालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले नाही, तर त्याला परत करायला लावले याबाबतही समाधान व्यक्त केले. काम बरोबर केले नाही म्हणून त्या कंपनीला काळ्या यादीत टाकणे हा उपाय असू शकत नाही, तर त्यांच्याकडून योग्यप्रकारे काम करून घेणे हे आपलं कर्तव्य असतं. आणि ते अभियंत्यांनी योग्यप्रकारे पार पाडलं आणि त्यातूनही जर कंत्राटदार योग्यप्रकारे काम करत नसेल तर पुढील कारवाई करू शकतात. पण कंत्राटदाराने हे काम चांगल्याप्रकारे केले तर त्याची ती चूक माफच करायला हवी, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community