जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी (१४ जुलै) तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात ते मृतावस्थेत सापडले. रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील घरात भाड्याने राहत होते.
मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाजनी गेल्या काही महिन्यांपासून एकटेच राहत होते.
शुक्रवारी (१४ जुलै) शेजाऱ्यांनी रवींद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रवींद्र महाजनी यांच्या मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, चार महिन्यात ‘इतक्या’ चित्यांनी गमावले प्राण)
रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या मुंबईत आहे. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली असून तो तात्काळ पुण्यात दाखल झाला आहे. तसेच रवींद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीकडे सोपवण्यात येणार आहे. आज म्हणजेच १५ जुलै, शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. तळेगाव ग्रामीण रुग्णालयात रवींद्र महाजनींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटात प्रमुख भूमिका
रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले. महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या सिनेमात काम केले. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही ते झळकले आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community