चांद्रयान ३ : केवळ सहाशे कोटींची मोहीम; इस्रोच्या कामगिरीचे चीनसह जगभरातून कौतुक

197
चांद्रयान ३ : केवळ सहाशे कोटींची मोहीम; इस्रोच्या कामगिरीचे चीनसह जगभरातून कौतुक

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरला सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्रावर अलगद उतरण्यात अपयश आल्यानंतर त्या मोहिमेचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी आणखी एक मोहीम आखण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) केली होती. त्यालाच अनुसरून सुमारे ६१५ कोटी रुपये खर्चून चार वर्षांत चांद्रयान-३ ही मोहीम सज्ज करण्यात आली. शुक्रवारी, १४ जुलै रोजी चांद्रयान- ३ ने अवकाशात यशस्वी झेप घेतली. या ‘चांद्रयान-३’चे प्रमुख तीन भाग आहेत. विक्रम लँडर (चांद्र स्थानक), प्रग्यान रोव्हर (स्वयंचलित वाहन) आणि प्रोपल्जन मॉड्यूल (वाहक यंत्रणा).

इस्रोने शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता चांद्रयान-३ मोहीम प्रक्षेपित केली. चांद्रयान १६ मिनिटांनी यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले. या यशस्वी प्रक्षेपणाचे देशातच नव्हे तर जगभरातून कौतुक होत आहे. भारताच्या या यशावर अनेक देशांनी आनंद व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – नाशिकमध्ये अजित पवार यांचं शक्तिप्रदर्शन)

अमेरिका, जपान, यूके आणि युरोपच्या अंतराळ संस्थांनी या मोहिमेसाठी इस्रोचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे चीनी मीडिया ग्लोबल टाइम्सने देखील चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाचा व्हिडिओ शेअर करून भारताचे कौतुक केले आहे.

चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ट्विट करत म्हंटले की, अभिनंदन! भारताने चांद्रयान-3 यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केले आहे. हे यान ऑगस्टमध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. या प्रयत्नात भारत यशस्वी झाल्यास चंद्रावर नियंत्रित लँडिंग करणारा चौथा देश ठरेल.

New Project 2023 07 15T111957.163

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटद्वारे चांद्रयान-3 अवकाशात पाठवण्यात आले. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी प्रक्षेपणानंतर सांगितले की, या वाहनाने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जर सर्वकाही योजनेनुसार झाले तर ते २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्रावर उतरेल.

चांद्रयान ३ ची काय आहेत उद्दिष्ट्ये?

चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचं उद्दिष्ट्यं आहे. तसंच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणं आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणं ही यामागची उद्दिष्ट्य आहेत. मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरेल. मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असून, त्याचे नेमके स्वरूप भारताच्या मोहिमेतून समजेल. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्ये उलगडण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील नोंदींचा उपयोग होईल. चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेच्या आर्टेमिस मिशनला चांद्रयान ३ कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. ती मोहीमही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.