मोदी आडनावाची बदनामी केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिक्षा आणि दोषसिद्धीवर स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. उच्च न्यायालयाने या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती.
कनिष्ठ न्यायालयाचा आदेश योग्य असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते. या आदेशात ढवळाढवळ करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने सांगितले होते. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर्षी कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणाला राहुल गांधी सातत्याने आव्हान देत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
(हेही वाचा Wakf Board : छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची जमीन हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करण्याची मागणी )
राहुल गांधींनी नेमके काय म्हटले होते?
राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत म्हटले होते की, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव सारखेच का आहे? सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का? राहुल यांच्या या विधानाबाबत भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर कलम ४९९, ५०० अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. 2019 च्या निवडणूक रॅलीत राहुल यांनी सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली, असा आरोप भाजपा आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता.