शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पादचारी पुलाचे लोकार्पण

अनेक वर्षे टिकणाऱ्या प्लेट गर्डर तंत्राचा बांधकामात वापर

257
शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पादचारी पुलाचे लोकार्पण
शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पादचारी पुलाचे लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ओलांडण्यासाठी शीव रुग्णालयाच्या पुढील बाजुस बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवार, १५ जुलै रोजी करण्यात आले. सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज सर्कल या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे पूर्व-पश्चिम असा रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा उपयोग होईल. विशेष म्हणजे, जेष्ठ नागरिकांना उपयुक्त असे सरकते जिने (एस्कलेटर) असणारा मुंबईतील हा पहिलाच पादचारी पूल असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आणि स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांच्या प्रयत्नातून बनवण्यात आलेल्या या पादचारी पुलाच्या या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार प्रसाद लाड, उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, माजी नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

New Project 2023 07 15T203648.662

मुंबई शहरात पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी शीव पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बांधावा, अशी एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार शीव येथे हा पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, धारावी, गांधी मार्केट या परिसरात ये जा करणार्‍या नागरिकांना फायदा होणार आहे. पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने, सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रूंदीचा हा पूल आहे. दिवसापोटी किमान ७ हजार ते ८ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे. पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या पुलाच्या कामांमध्ये नवीन तंत्रज्ञान असलेल्या प्लेट गर्डरचा वापर केल्याने याचा खर्च वाढला गेल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

New Project 2023 07 15T203737.204

(हेही वाचा – Devendra Fadanvis : पोटदुखी कमी करण्यासाठी म्हणून ‘डॉ. शिंदें’ना आणले; फडणवीसांनी विरोधकांना हाणला टोला)

कोविड काळातील ताळेबंदी, सरकते जिने पुरवठादाराकडून झालेला विलंब, वृक्ष प्राधिकरण आणि वाहतूक विभागाची परवानगी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात या पुलाचे काम ५२ महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे गांधी मार्केटला जाण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार असून धारावीतून गांधी मार्केट आणि सायन कोळीवाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पादचाऱ्यांना सुरक्षितता लाभून रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेही शक्य होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी देखील या पुलाची मदत होईल असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.