Humanity : मानवतेचे दर्शन! आई परीक्षेला गेली, महिला कॉन्स्टेबलने सांभाळले बाळाला

141

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील ओढव या ठिकाणी उच्च न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका आईच्या सहा महिन्यांच्या बाळाला एका लेडी कॉन्स्टेबलने एवढे छान सांभाळले की, या घटनेचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहेत. एवढेच नव्हे तर नेटीजन्सकडून या लेडी कॉन्स्टेबलचं खूप कौतुक होत आहे.

अहमदाबाद येथील ओढव या ठिकाणी एक महिला उच्च न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी मिळण्यासाठी परीक्षा द्यायला आली होती. तिच्यासोबत तिचे सहा महिन्यांचे बाळसुद्धा होते. ती परीक्षा देत असताना काही वेळाने तिचे बाळ रडायला लागले. ते बाळ काही केल्या राहत नव्हते. हे दृश्य पाहून तिथे आपले कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला शिपायांनी पुढाकार घेऊन त्या बाळाला उचलून घेतले आणि त्या बाळाबरोबर मोठ्या प्रेमाने खेळायला लागल्या.

ते दृश्य पाहून तिथल्या काही उपस्थितांनी त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आणि गुजराती भाषेत “ઓઢવ ખાતે પરીક્ષા આપવા માટે આવેલ મહીલા પરીક્ષાર્થીનુ બાળક રોતું હોય જેથી મહિલા પરીક્ષાથી નું પેપર દરમિયાન સમય બગડે નહીં અને પરીક્ષા વ્યવસ્થિત રીતે આપી શકે તે સારું મહિલા પોલીસ કર્મચારી દયાબેન નાઓએ માનવીય અભિગમ દાખવી બાળકને સાચવેલ જેથી માનવીય અભિગમ દાખવવામાંઆવેલ છે” असे कॅप्शन लिहिले.

याचा अर्थ असा होतो की, “ओढव विभागात परीक्षा द्यायला आलेल्या एका मातेचे बाळ रडायला लागले. त्या बाळाच्या रडण्याने त्या महिलेचा वेळ वाया जाऊ नये म्हणून, तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचारी दयाबेन यांनी मानवतेचा साक्षात्कार दाखवून त्या रडणाऱ्या बाळाचा छान सांभाळ केला.”

या फोटोंना आतापर्यंत जवळजवळ तीन हजारपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. या महिला शिपायाचे सोशल मीडियावर लोक खूप कौतुक करत आहेत. काहीजण म्हणतात की, एका आईला दुसरी आईच समजू शकते. तर काहीजण म्हणाले की, अहमदाबाद पोलिसांनी जे सहकार्य त्या महिलेला केले, आई बनून त्या बाळाला सांभाळलं ते प्रशंसनीय आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.