जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे. या आदेशाच्या विरोधात मशीद प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. या याचिकेत जिल्हाधिकार्यांचा आदेश रहित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ जुलै २०२३ या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
जिल्हाधिकार्यांनी जुम्मा मशीद विश्वस्तांना पांडववाड्याच्या चाव्या जिल्हा अधिकार्यांकडे देण्यास सांगितले. त्यांच्या आदेशात प्रतिदिन दोनच व्यक्तींना नमाज पढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोनपेक्षा अधिक लोकांना येथे नमाज पढण्यापासून रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
(हेही वाचा Eknath Shinde : ‘सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून…’ काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?)
‘पांडववाडा संघर्ष समिती’चे म्हणणे आहे की, स्थानिक मुसलमानांनी अतिक्रमण केले असून ते तेथे नमाजपठण करत आहेत. जुम्मा मशीद कमिटीने केलेले हे अतिक्रमण हटवण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. तहसीलदार म्हणाले, ‘‘हिंदू वर्ष १९८० पासून या परिसरावर दावा करत आहेत. हा परिसर महाभारतातील पांडवांशी संबंधित असल्याचे ते सांगतात; कारण त्यांनी या भागात काही वर्षे घालवली होती. पांडववाडा संघर्ष समितीने १८ मे २०२३ या दिवशी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार अर्ज दिला होता.’’
पांडववाडा संघर्ष समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन !
पांडववाडा संघर्ष समितीच्या वतीने जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, प्रत्यक्षात हे एक प्राचीन हिंदु ठिकाण आहे. येथे असलेली प्राचीन रचना मंदिराची आहे. महाभारत काळातील कलाकृती आजही येथे सापडतील.
Join Our WhatsApp Community