आधी आम्ही दोघे होतो आता अजित पवार सोबतीला आले आहेत. अजित दादा पहाटेपासून काम सुरु करतात, मी रात्री उशिरापर्यंत काम करतो आणि फडणवीस ऑल राउंडर आहेत, ते बॅटिंग, बॉलिंग करतात, चौकार आणि षटकार मारतात. त्यामुळे आमच्या सरकारची ताकद वाढली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत फटकेबाजी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना शिंदेंनी रणनीती स्पष्ट करताना विरोधकांना फटकारले.
(हेही वाचा Maharashtra assembly session : फडणवीसांनी उडवली विरोधकांच्या पत्राची खिल्ली; म्हणाले… )
राज्यात पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. पाऊस न आल्याने आम्हाला देखील चिंता आहे. शेवटी निसर्ग आहे लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीठ होत आहे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. विरोधी पक्ष गोंधळलेला असून त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. तसेच विरोधी पक्ष कुठे आहे हे देखील शोधले पाहिजे. आम्ही तिघांनीही विरोधी पक्षनेते पद सांभाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. विरोधकांना चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community