राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलिकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे म्हणाले.
(हेही वाचा – Seema Haider : सीमा हैदरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली, तिला भेटण्यावरही बंदी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, असा कायदा अस्तित्वात आणण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू असून, समितीचा निर्णय होताच, चालू पावसाळी अधिवेशनातच हा कायदा लागू करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community