दाऊद टोळीचा आरिफ भाईजान याची ठाण्यातील संपत्ती एनआयएकडून जप्त

245
दाऊद टोळीचा आरिफ भाईजान याची ठाण्यातील संपत्ती एनआयएकडून जप्त
दाऊद टोळीचा आरिफ भाईजान याची ठाण्यातील संपत्ती एनआयएकडून जप्त

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा मदतनीस छोटा शकील यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केलेल्या मुंबईतील वादग्रस्त व्यापारी आरिफ अबुबकर शेख (५९) उर्फ ​​आरिफ भाईजान याचे मिरारोड येथील घर एनआयएने जप्त केले आहे. आरिफ भाईजान हा कुख्यात गुन्हेगार छोटा शकील याचा मुंबईतील सर्व व्यवहार हाताळत होता, तसेच दहशतवादी कृत्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप आरिफ भाईजान याच्यावर आहे.

२०२२ मध्ये आरिफ भाईजान आणि त्याचा नातेवाईक शब्बीर अबुबकर शेख (५१) या दोघांना दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आरिफ भाईजान हा तुरुंगात असून मार्च महिन्यात न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याची टोळी शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा प्रसारित करणे आणि अनधिकृत मालमत्ता बाळगणे यात गुंतली आहे, या बेकायदेशीर धंद्यातून येणारा पैसा दहशतवादी निधी उभारण्यासाठी आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तपास करीत असून या प्रकरणी दाऊद इब्राहिम, त्याचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएने मुंबईतून छोटा शकीलचे सर्व व्यवहार सांभाळणारा आरिफ अबूबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा नातलग शब्बीर यांना अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा – Amit Shah : अमित शहा यांची चाणक्यनिती; २०२४ चा निकाल २०१९ सालचा रेकॉर्ड मोडणार)

दरम्यान एनआयए सोमवारी आरिफ भाईजान याचे मीरा रोड येथील गौरव ग्रीन रो हाऊस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील घर जप्त केले आहे. भाईजान याने ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावलेल्या पैशातुन खरेदी केली असल्याची एनआयएने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. एनआयएने अटक केलेल्या तीन आरोपी आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख उर्फ शब्बीर टकला आणि मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ सलिम फ्रूट आणि फरार आरोपी दाऊद इब्राहिम कासकर उर्फ शेख दाऊद, हसन शकील बाबू मोहिद्दीन शेख उर्फ छोटा शकील या दोघांविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. यांच्याविरुद्ध उप्पा आणि भारतीय दंड संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.