महाराष्ट्र-गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते.
गुजरात राज्यातील उमरगाव तालुका आणि महाराष्ट्र राज्यातील डहाणू व तलासरी या सीमेवर गेल्या काही वर्षांपासून वाद निर्माण झालेला आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमेवर वेवजी, गिरगाव, हिमानिया, झाई, सांभा, आच्छाड या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत. मात्र, गुजरातच्या सूलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळ जवळ ५०० मीटर जागेवर अतिक्रमण केलेले आहे, असे आमदार निकोले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
(हेही वाचा – Maharashtra : महाराष्ट्र राज्यात फक्त 2.44 लाख पदे रिक्त; मागील 30 महिन्यांपासून भरले नाही एकही पद)
गेल्या वर्षी गुजरात राज्यातील उमरगाव तालुक्यातील गोवाडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्यातील झाई गावातील काही रहिवाशांना नोटीस बजावली होती की, तुमची घरे ही आमच्या गोवाडे (गुजरात राज्याच्या) हद्दीत आहेत. वास्तविक वेवजी ग्रामपंचायत ही महाराष्ट्र हद्दीत आहे. येथील सर्व्हे क्र. २०४ यांचा फेरफार क्र. १४४ असा पडलेला आहे. ती जागा साधारणपणे ५ एकर ३० गुंठे जागा आहे. ही जागा आजही गुजरात च्या सूलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत दिसून येते. त्यामुळे हे अतिक्रमण असल्याचा आरोप निकोले यांनी केला.
त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गावाला भेट दिलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये जिल्ह्याधिकारी, विभागीय आयुक्त यांना त्या ठिकाणी पाठवू. उक्त प्रश्न सुटला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने लवकर बैठक घेण्यात येईल, असे मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community