शिवसेना हा एनडीेएचा सर्वात जुना मित्र आहे. आमची युती एक वैचारिक व भावनिक युती आहे, असे सांगतानाच २०२४ ची निवडणूक ही फक्त नरेंद्र मोदींची नाही तर भारताची आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटून 2024 ला मोदींचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांचे स्वागत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी केले. दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले तेव्हा त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बैठकीच्या ठिकाणी स्वागत करण्याचा सन्मान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना तामिळनाडू व नागालँडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत देण्यात आला.
विरोधकांच्या बैठकीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, एका बाजूला विचारधारा असलेले संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक अद्यापही त्यांचा नेता ठरवू शकलेले नाहीत. आत्मविश्वास नसलेले सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. २०२४ ला संपूर्ण देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढी एनडीए बळकट होईल, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एनडीएमध्ये ३८ घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा देशभरात एनडीएला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार पक्षात आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाल्याचे ते म्हणाले. डबल इंजिनचे सरकार आल्याने महाराष्ट्राची स्थिती बदलली आहे. आम्हाला क्लीन स्वीप मिळेल. आमच्या महायुतीसोबत 210 आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले. मोदींनी गेल्या ९ वर्षांत केलेले काम बोलके आहे. काँग्रेसला जे कधी जमले नाही ते मोदीजींनी ९ वर्षांत केले आहे. अनेक योजना राबवल्या आहेत. जगभरात मोदींचा सन्मान केला जात आहे, असे ते म्हणाले. मोदींनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढं एनडीए बळकट होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहेओ. पंतप्रधानांनी भारताला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशाची अर्थव्यवस्था चांगली राहण्यामागे मोदींचा हात आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community