मागील दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे लोकांची दैना उडालेली असताना प्रत्यक्षात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाची हजेरी मात्र दिसून आलेली नाही. मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वांत छोटे तलाव असलेल्या तुळशी तलावातील पाण्याची पातळी ओलांडली गेली असली तरी मुंबईकरांची मोठ्याप्रमाणात तहान भागवणाऱ्या मोठी धरणे तसेच तलावांमध्ये पावसाची हजेरी अगदी असमाधानकारक आहे. त्यामुळे तुळशी तलाव भरल्याने तलाव भरण्याचा श्री गणेशा झाला असला तरी ही सर्व धरणे एव्हाना ५० टक्यांच्या वर भरुन वाहणे अपेक्षित होते, परंतु यासर्व धरणांमध्ये आजवर केवळ ३९ ते ४० टक्के एवढाच पाणी साठा जमा झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण तथा तलावांपैंकी तुळशी तलाव हे मध्यरात्री ओसंडून भरुन वाहू लागले. तुळशी तलावातील पाण्याची क्षमता ही ८ हजार ४६ दशलक्ष लिटर एवढी असून या तलावातून मुंबईतील काही भागाला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुळशी तलाव भरले होते. तर उर्वरीत मोडकसागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा आणि विहार या धरणांमध्ये मात्र पाऊसच पडत नसल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडणारी आहे. यासर्व तलावांमधील तानसा तलावांमध्ये (७१.०२ टक्के), विहार व मोडक सागर तलावात (६२.९२ टक्के) एवढा पाणी साठा जमा झाला असून उर्वरीत सर्व धरणांमधील पाणी साठा सरासरी ४० टक्क्यांच्या आसपासच आहे. मुंबईला सर्वांत जास्त पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये (३२.३४ टक्के)तर अप्पर वैतरणा धरणात (१४.८० टक्के) एवढा पाणी साठा जमा झाला आहे.
मुंबईला सर्व धरणांमध्ये सध्या एकूण ३९.६१ टक्के अर्थात ५ लाख ७३ हार ३४० दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा झाला आहे. मागील वर्षी याच तारखेला यासर्व धरणांमधील पाणी साठा हा १२ लाख ८० हजार ८६८ दशलक्ष लिटर्स एवढा होता, तर त्या आधीच्या वर्षी म्हणजे २०२१मध्ये हा पाणी साठा ४ लाख ८० हजार ७८३ दशलक्ष लिटर्स एवढा होता.
(हेही वाचा – DCM Ajit Pawar : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त)
अप्पर वैतरणा : पाणी साठा (१४.८०टक्के), बुधवारचा पाऊस (३२ मि.मी)
मोडक सागर: पाणी साठा (६२.९९टक्के), बुधवारचा पाऊस (७४ मि.मी)
तानसा: पाणी साठा (७१.०२टक्के), बुधवारचा पाऊस (४५ मि.मी)
मध्य वैतरणा : पाणी साठा (५०.६९टक्के), बुधवारचा पाऊस (६० मि.मी)
भातसा : पाणी साठा (३२.३४टक्के), बुधवारचा पाऊस (४३ मि.मी)
विहार: पाणी साठा (६२. ९२ टक्के), बुधवारचा पाऊस (१२१ मि.मी)
तुळशी : पाणी साठा (१००टक्के), बुधवारचा पाऊस (२५४ मि.मी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community