BMC : महापालिका अधिकाऱ्यांची शाळा; एसआयटीचा अभ्यास

186
BMC : महापालिका अधिकाऱ्यांची शाळा; एसआयटीचा अभ्यास

महापालिकेच्या (BMC) १२ हजार २४ कोटी रुपयांच्या कॅगच्या अहवालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महिन्यात महापालिकेच्या सर्व अनियमित कामांची पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार या समितीने संबंधित खातेप्रमुख आणि प्रमुख अभियंता यांना आपल्या कार्यालयात बोलावून प्रत्येक विभागांच्या कार्यपध्दतीची माहिती जाणून घेतली. त्यामुळे आता सर्व खातेप्रमुख आणि प्रमुख अभियंत्यांची एसआयटीच्या माध्यमातून शाळा घेतच एसआयटीचे अधिकारी या सर्व कामकाजांच्या अभ्यासाला जोरात सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.

मुंबई महापालिकेतील (BMC) कोविड काळातील खरेदीसह दहिसर भूखंड, पूल आणि रस्ते, घनकचरा, देवनार डम्पिंग ग्राऊंड, मलिन:सारण वाहिनी तसेच पंपिंग स्टेशन आदी विभागांसह अनेक कंत्राट कामांमध्ये २८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत झालेल्या सुमारे १२ हजार १३ कोटींची विशेष कॅग चौकशीचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या कॅगच्या अहवालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार समिती गठीत झाल्यानंतर महापालिकेच्या या कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी रस्ते, पूल, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण वाहिनी प्रचालन, मलनिस्सारण वाहिनी प्रकल्प, विकास नियोजन विभाग, पर्जन्य जल वाहिनी विभाग आदींसह इतर संबंधित विभाग तथा खाते यांचे प्रमुख अधिकारी तथा प्रमुख अभियंता या सर्वाना आपल्या कार्यलयात बोलावून घेत निविदा पद्धत कशी राबवली जाते, कंत्राट कसे मंजूर केले जाते तसेच कसे दिले जाते याची प्रशासकीय बाब समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – इर्शाळवाडी दरड दुर्घटना : मदतीसाठी सरसावले लालबाग गणेशोत्सव मंडळ)

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसाठी महापालिकेच्या (BMC) कामकाजाची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक असल्याने या समितीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याची जुजबी माहिती करून घेतली. त्यामुळे या जुजबी माहितीच्या आधारे आता प्रत्येक प्रस्तावांचा अभ्यास केला जाणार असून या सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा स्वतंत्र प्रस्तावाच्या चौकशीच्या अनुषंगाने बोलावले जाणार असल्याचेही कळते. तसेच ही समिती महापालिकेच्या संबंधित कार्यालयात जाऊन निविदा आणि मंजूर कंत्राट काम या अनुषंगाने चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.