नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवावे आणि अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गोऱ्हे यांच्या विरोधात सभापतींकडे अपात्रतेची नोटीस दाखल केली होती. मात्र राज्यघटनेतील एका नियमाचा आधार घेत तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी नीलम गोऱ्हे यांचे पद कायम राहील, असा निर्णय दिला.
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त असून, प्रभारी सभापती म्हणून नीलम गोऱ्हे (उपसभापती) जबाबदारी पाहत आहेत. त्यामुळे खुद्द प्रभारी सभापतींच्या अपात्रतेची मागणी झाल्याने त्यावर निर्णय कोण घेणार, असा सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
परंतु, राज्यघटनेच्या १०व्या अनुसूचीतील नियम क्रमांक ६ अन्वये पक्षांतराच्या आधारावर सभागृहाचा सदस्य अपात्र ठरला आहे की नाही, असा कोणताही प्रश्न उद्भवल्यास, तो प्रश्न अध्यक्षांच्या किंवा सभापतींच्या निर्णयासाठी संदर्भित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल. मात्र, सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती अशा अपात्रतेच्या अधीन झाले आहेत, असा प्रश्न उद्भवला असेल, तर हा प्रश्न सभागृहाच्या अशा सदस्याच्या निर्णयासाठी संदर्भित केला जाईल. ज्यांना सभागृह या बाजूने निवडेल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.
(हेही वाचा CM Eknath Shinde : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्री)
ठाकरे गटाने आपल्या नोटिशीत या नियमाचा संदर्भ दिला नाही. याउलट चुकीची मागणी करीत राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या चुकीच्या प्रयत्नांमुळे त्यांचेच हसे झाले. विधानपरिषद सभागृहाने सर्वानुमते एका सदस्याची निवड करून, त्याने या प्रकरणाचा निवडा करावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली असती, तर कदाचित निर्णय वेगळा लागला असता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तालिका सभापतींनी निर्णय काय दिला?
- विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद सदस्यत्व मुदत १४ मे २०२० पासून सुरू झाली. त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली त्यावेळी त्यांचा राजकीय पक्ष शिवसेना हाच होता. विधानमंडळ पक्षाचे नावही शिवसेना विधिमंडळ पक्ष असे नमूद होते. अद्यापपर्यत त्यात कोणताही बदल झालेला नाही.
- उपसभापती पदावरून दूर करणे आणि अपात्रतेची नोटीस या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. अपात्रतेच्या नोटिशीचा कोणताही परिणाम त्यांच्या उपसभापतीपदी असण्यावर होऊ शकत नाही, असे तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी सांगितले.