दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गावरील गोल मंदिर अर्थात हनुमान मंदिर म्हणून प्रसिध्द असलेल्या मंदिराला आता खड्डयांनी विळखा घातला आहे. येथील खड्डयांवर रामबाण उपाय म्हणून रिऍक्टीव्ह अस्फाल्टचा मारा केला असला तरी प्रत्यक्षात हे नवीन तंत्रही बाद ठरल्याचे दिसून येत आहे. रिऍक्टीव्ह अस्फाल्टद्वारे बुजवलेल्या येथील खड्डयांची वारंवार तपासणी केल्यांनतर हे तंत्रही पावसाच्या पाण्यात टिकले नसल्याचे दिसून आले. उलट अस्फाल्टचे मटेरियलच पावसाळ्यात अशाप्रकारे वाहून गेले की मोठ्या विवरांप्रमाणे खड्डे पडल्याचे प्रकार दिसून आले आहे.
दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गावरील गोल मंदिर अर्थात हनुमान मंदिर म्हणून प्रसिध्द असलेल्या मंदिराला आता खड्डयांनी विळखा घातला आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी तसेच मागील बाजुस खड्डयांचे साम्राज्य पसरले असून वाहने याठिकाणी वळसा घालून जात असले तरी या खड्डयांमुळे येथील वाहतुकीला पूर्ण ब्रेक लावायची वेळ येते. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ काही दिवसांपूर्वी पडलेल्या खड्डयांवर जी उत्तर विभाग कार्यालयाच्यावतीने कोल्ड मिक्सचे मटेरियल टाकले होते. परंतु हे कोल्डमिक्सचे मटेरियल पावसात वाहून गेल्यानंतर या भागासाठी नियुक्त केलेल्या संस्थेद्वारे रिऍक्टीव्ह अस्फाल्टद्वारे हे खड्डे बुजवण्यात आले होते. हे रिऍक्टीव्ह अस्फाल्ट अत्यंत टिकावू असल्याचा दावा रस्ते विभागाने केला होता. परंतु मागील चार दिवसांपासून या खड्डयांतील मटेरियल निखळून वाहून जावू लागले असून आता या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
(हेही वाचा – Stomach Infection : मुंबईत वाढतोय पोटाचा संसर्ग)
याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या महिला वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या खड्डयांचे फोटो आपण महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवूनही त्यांचे याकडे लक्ष नाही. महापालिकेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे फोटोही पाठवले. पण चार दिवसांपासून हे खड्डे बुजवण्याची कार्यवाही केली जात नाही. मात्र, यातील मटेरियल वाहून जात हे खड्डे आता खोलवर पसरु लागले असून प्रत्येक वाहनांचा टायर या खड्डयांत जावून अडकतो, तर दुचाकी स्वारही या खड्डयांमध्ये पडण्याचे प्रकार बऱ्याचदा घडतात असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. कोल्डमिक्सचा वापर केल्यानंतरही रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी आता हा खड्डा रिऍक्टीव्ह अस्फाल्टद्वारे बुजवला असल्याचे सांगितले होते. परंतु आता हे नवीन रिऍक्टीव्ह अस्फाल्टही खड्डयात टिकत नसल्याची बाब या खड्डयांद्वारे दिसून आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community