Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणाऱ्यांनी पायावर धोंडा मारून घेतला

250
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणाऱ्यांनी पायावर धोंडा मारून घेतला
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणाऱ्यांनी पायावर धोंडा मारून घेतला

वंदना बर्वे

लोकसभेची आगामी निवडणूक केवळ ‘रालोआ-३८’ आणि ‘इंडिया-२६’ या पक्षांचीच नव्हे तर; तटस्थ भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांचेही भविष्य ठरविणारी राहणार आहे. दिल्लीच्या तख्तावर बसण्यापूर्वी देशातील सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीची परीक्षा पास करावी लागणार आहे. यासाठी दोन राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वात दोन आघाड्या तयार झाल्या आहेत. यात भाजपप्रणित रालोआ आणि काँग्रेसप्रणित इंडियाचा समावेश आहे. कोणता पक्ष कोणत्या झेंड्याखाली लढणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. भाजपप्रणित रालोआत ३८ तर काँग्रेसप्रणित इंडियामध्ये २६ पक्ष सामील झाले आहेत.

परंतु, ११ असे पक्ष आहेत ज्यांनी तटस्थ भूमिका घेत कोणत्याही आघाडीत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. यात वायएसआर काँग्रेस, बीजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आणि बहुजन समाज पक्ष प्रमुख आहेत. देशातील निवडणुकीच्या भूतकाळात डोकावून बघितलं तर असं लक्षात येतं की, जेव्हा दोन आघाड्या निवडणुकीच्या मैदानात असतात आणि काही पक्ष स्वबळावर लढतात त्यांची ताकद निकालाअंत कमी झालेली असते. अशा पक्षांची मतांची टक्केवारी घसरत आणि सदस्यांची संख्या सुध्दा कमी झाल्याचे दिसून येते. सध्या स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेणाऱ्या पक्षांची संख्या ११ आहे. तर त्यांच्या खासदारांची संख्या ६४ एवढी आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : शहरात मुसळधार पाऊस; मच्छिमारांसाठी धोक्याची सूचना)

जेव्हा दोन आघाड्या मैदानात असतात तेव्हा मतदार सुध्दा या दोनपैंकी एका आघाडीला आपली पसंती दर्शवित आले आहेत. यामुळे क्षेत्रीय पक्षांना नुकसान झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड बघायला मिळतो. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात क्षेत्रीय पक्ष एकजूट झाले आणि त्यांनी जनता दलाच्या झेंड्याखाली निवडणूक लढविली. मात्र, डाव्या पक्षांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. परिणाम असा झाला की डाव्यांच्या १९ जागा कमी झाल्या होत्या. याहीपेक्षा मोठा धक्का बसला होता तो द्रमुकला. द्रमुकच्या २३ जागा होत्या.

त्या दोनवर आल्या. १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वात जनता दल आणि भाजपची आघाडी झाली होती. या निवडणुकीचा निकाल सुध्दा असाच होता. २०१४ च्या निवडणुकीत मायावती यांच्या बसपाने एकला चलोची भूमिका घेतली होती. याचा परिणाम असा झाला की बसपची एकही जागा निवडून आली नाही. २०१९ च्या निवडणुकीत सपासोबत आघाडी करून निवडणूक लढली आणि बसपचे १० खासदार निवडून आले. जेडीयूने सुध्दा २०१४ मध्ये स्वबळावर निवडणूक लढली होती. तेव्हा जेडीयूचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. २०१९ मध्ये भाजपसोबत आघाडी केली आणि जेडीयूचे १६ खासदार निवडून आले. आता २०२४ मधील निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. ६४ पक्षांनी आपला तंबू निश्चित केला आहे. उर्वरित ११ पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.