वसई-विरारमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याने पुन्हा एकदा शहरात निर्बंध घालण्यास वसई-विरार महापालिकेने सुरुवात केली आहे. आठवडी बाजार बंद केल्यानंतर आता हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने आसनव्यवस्था ठेवण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.
विनामास्क नागरिकांवर कारवाई सुरू
वसई-विरार महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २३ मार्चपर्यंत मागील दोन महिन्यांतील सर्वात जास्त म्हणजे १ हजार १८९ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ७८९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या वाढत्या रुग्णसंख्येसाठी पालिकेने मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास मागील महिन्यापासून पुन्हा सुरुवात केली. तसेच कडक निर्बंध घालत शाळा आणि महाविद्यालये देखील बंद केली आहेत. तर विशेष म्हणजे वसई-विरार मधील सर्व आठवडी बाजार देखील बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने मागील आठवड्यात घेतला. त्यानंतर आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर निर्बंध आणण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. पालिकेच्या प्रभाग समिती स्तरावर हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट मालकांच्या बैठका घेण्यात आल्या असून, या बैठकीत त्यांना नव्याने आखलेल्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचाः मुंबईत आता सुगंध देणारी ‘कचरापेटी’!)
हे आहेत निर्बंध
यामध्ये हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंटच्या वेळेमध्ये बदल करण्यात आली आहे. आधी रात्री १ वाजेपर्यंत ही आस्थापने खुली ठेवण्यास मुभा होती. मात्र आता ती वेळ ११ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच केवळ ५० टक्के आसनव्यवस्था ठेवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. सुरक्षित वावर, मास्क, सॅनिटायजरचा योग्य वापर करुन ग्राहकांना सेवा देण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसेच या नियमांचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार असून, संबंधित आस्थापनांस एकदा समज देण्यात येईल. मात्र पुन्हा तीच चूक केल्यास संबंधित आस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. तसेच दुसरीकडे मॅरेज हॉलवर देखील हेच नियम लागू करण्यात आले आहेत. याठिकाणी एका कार्यक्रमासाठी ५० लोकांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. ५०हून जास्त उपस्थिती असल्यास कारवाई करण्यात येत असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोना उपचार केंद्र सुरू
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पालिकेने वरुण येथील कोरोना उपचार केंद्र पुन्हा सुरु केले आहे. १ हजार ५०० खाटांचे असलेले हे उपचार केंद्र पालिकेने भाडेतत्वावर घेऊन येथे तात्पुरते कोरोना उपचार केंद्र बनविले आहे. याठिकाणी जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याने याठिकाणी कोरोना लसीकरणास पालिकेने फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली होती. मात्र मार्चमध्ये पुन्हा रुग्ण वाढल्याने हे उपचार केंद्र सुरू केले असून, येथील लसीकरण बंद केले आहे.
Join Our WhatsApp Community