NDA : भाजपप्रणित रालोआचा किल्ला अभेद्य

158
  • वंदना बर्वे

जुलै महिन्याच्या या आठवड्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शहरात दोन मोठ्या घटना घडल्या. पहिली घटना घडली ती कर्नाटकच्या बंगलोरमध्ये आणि दुसरी घटना दिल्लीतील अशोका हॉटेलमधली. मंगळवार १८ जुलै रोजी देशभरातील २६ विरोधी पक्षांची एक बैठक बंगलोरमध्ये झाली. यात या पक्षांनी आपल्या आघाडीला नवे नाव दिले. ते म्हणजे, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया). दुसरीकडे याच दिवशी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ३८ पक्षांचे नेते त्यात सहभागी झाले होते.

सत्ताधारी भाजपच्या तंबूत ३८ पक्ष आहेत आणि विरोधकांच्या तंबूत २६ पक्ष आहेत. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. तत्पूर्वी पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. अशात, सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कुणाची आघाडी जास्त प्रभावी आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. खरे सांगायचे झाले तर, हा प्रश्न निर्माण होण्याची काहीच गरज नाही. कारण, आकडा जरी बघितला तरी कुणालाही सहज लक्षात येईल की भाजपप्रणित रालोआचे पारडे जड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता निर्विवाद सर्वांत उंचावर आहे. याशिवाय, लोकसभा आणि राज्यसभेतील संख्याबळ सुध्दा नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे.

आधी रालोआचे संख्याबळ बघू या. रालोआचे लोकसभेत ३३२ खासदार आहेत. यात भाजपचे सर्वाधिक ३०१. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले १३, लोक जनशक्ती पक्षाचे (पशुपती कुमार पारस) सहा सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे (अजित गट) दोन, अपना दल (एस)चे दोन खासदार आहेत. असे नऊ पक्ष आहेत ज्यांचा प्रत्येकी एक खासदार आहे. एकूण खासदारांची संख्या झाली ती ३३२.

दुसरीकडे, नवनिर्मित इंडिया आघाडीचे १४१ खासदार आहेत. यात कॉग्रेस ४९, द्रमुक २४, टीएमसी २३, जेडीयू १६, उद्धव ठाकरे गट ६, समाजवादी पक्ष ०३, आप १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ३, इंडियन युनियन मुस्लिम लीग ३, झारखंड मुक्ती मोर्चा १, माकपा ३, भाकपा २, केरळ काँग्रेस (एम) १, नॅशनल कॉन्फरन्स ३, आरएसपी १, द्रमुक १ आणि व्हीसीके १ असे एकूण १४१ खासदार आहेत.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?)

याशिवाय, २४ असे पक्ष आहेत ज्यांचा एकही खासदार नाही. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जनसेना (पवन कल्याण), जननायक जनता पार्टी, तमिळ मनिला काँग्रेस, जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा, आयपीएफटी, आरएलएसपी, बोडो पीपल्स पार्टी, बीडीजेएस, पीएमके, केरळ काँग्रेस, एमजीपी, जनतापार्टी राष्ट्रीय सभा, अगपा, यूडीपी, निषाद पार्टी, सुभास्पा, यूपीपीएल, एसएसडीपी, एआयआरउनसी, जन सूरज पार्टी, शिरोमणी अकाली दल (युनायटेड), प्रहार जनशक्ती पार्टी आणि गोरखा नॅशनल लिबरेशन पार्टीचा समावेश आहे.

महत्त्वाचा मुद्या असा की, ज्या पक्षाचा एकही खासदार नाही ते पक्ष रालोआचे सदस्य आहेत, असा टोमणा विरोधकांकडून मारला जात आहे. मात्र, हे सत्य असले तर या सर्व पक्षांचा कॅडर मजबूत आहे आणि लोकांवर प्रभाव आहे. बुथ मॅनेजमेंट करण्यात असे पक्ष मते मिळविण्यात सिंहाचा वाटा नेहमीच उचलत आले आहेत, हे विरोधकांनी विसरायला नको. यासर्व पक्षांचा त्यांच्या राज्यात, समाजात, जातीतील मतदारांमध्ये चांगली पकड आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर जयंत चौधरी यांचे घेता येईल. रालोदचा एकही खासदार नाही. उत्तरप्रदेश विधानसभेत केवळ सहा सदस्य आहेत. मात्र, उत्तरप्रदेश, हरयाणा आणि राजस्थानमधील जाट समुदायात रालोदची मजबूत पकड आहे. जाट मते मिळावी म्हणून रालोदशी हात मिळविण्याचा प्रयत्न विविध पक्षांकडून केला जातो तो याच कारणामुळे. याचप्रमाणे बिहारचा एचएएम, यूपीचा सुभास्पा, निषाद पक्ष असे पक्ष आहेत. ज्यांची ताकद संसदेत नाही, पण प्रदेश आणि जातीच्या आधारावर त्यांची पकड नक्कीच आहे. निर्णयाची दिशा बदलू शकतात अशा निर्णायक भूमिकेत या पक्षांचे मतदार आहेत. लोकशाहीत मतदार हाच राजा असतो आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाला सिंहासनावर बसवितो हे तर निकालातूनच स्पष्ट होईल. परंतु, सध्याची आकडेवारी लक्षात घेतली तर भाजपप्रणित रालोआचे पारडे जड असल्याचे दिसून येते.

एनडीएने काय निर्णय घेतला?

दिल्लीत एनडीए कॅम्पमधील ३८ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांच्या एकतेवर जोरदार हल्ला चढवला. पीएम मोदी म्हणाले की, एनडीए ही मजबुरी नाही, तर मजबूत युती आहे. एनडीएमध्ये कोणीही लहान किंवा मोठा नाही. विरोधी एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान म्हणाले की बंगालमध्ये टीएमसी आणि डावे आणि केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले आहेत, परंतु बंगळुरूमध्ये मैत्री दाखवत आहेत. पंतप्रधान म्हणाले की विरोधी एकता ही छोट्या पक्षांच्या स्वार्थासाठी असलेली युती आहे ज्यांना कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवायची आहे. पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या बैठकीत ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवल्याचा दावा केला आणि या दाव्यामागे आपले युक्तिवादही केले. प्रत्येक वर्गाला सोबत घेण्याचा मंत्र पंतप्रधान मोदींनी दिला. याच्या मदतीने भाजप पुढील वर्षी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यामुळे मोदी राज्य पुन्हा येण्याची शक्यता कुणीही नाकारू शकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.