आपल्या शरीरातील धमान्यांना जीवनरेषा म्हणजेच लाईफलाईन म्हणतात. या धमान्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते म्हणूनच तर या धमान्यांच्या माध्यमातून रक्तप्रवाह आपल्या संपूर्ण शरीरात सुरू असतो. तसेच आपल्याला देशात कुठेही प्रवास करायचा असेल तर रेल्वेने प्रवास करता येतो. रेल्वेचं जाळंही संपूर्ण देशभरात पसरलेलं आहे.
आपल्या देशात एकूण जवळजवळ आठ हजार रेल्वे स्थानकं आहेत. काही मोठ्या राज्यांमध्ये तर रेल्वे स्थानाकांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या देशात असेही एक राज्य आहे जिथे फक्त एकच रेल्वे स्थानक आहे. होय, हे खरं आहे. रेल्वेचं मोठं जाळं असलेल्या आपल्या देशातल्या एका राज्यात केवळ एकच रेल्वे स्थानक आहे. त्या राज्याचं नाव आहे मिजोरम. या मिजोरम राज्यात बैराबी नावाचं एकच रेल्वे स्थानक आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की, इथे राहणाऱ्या लोकांना प्रवास करायला किती त्रास होत असेल.
(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारच्या धक्कादायक अहवाल)
मिजोरम हे राज्य आपल्या देशातील पूर्वेकडील राज्यांपैकी एक आहे. या राज्यातील कोलासीब नावाच्या जिल्ह्यामध्ये बैराबी नावाचं एक शहर आहे. याच शहरात इथलं एकमेव रेल्वे स्थानक आहे. मिजोरम राज्याची लोकसंख्या अकरा लाखांच्या जवळपास आहे. या रेल्वे स्थानकावरून लोक फक्त प्रवासच करत नाहीत तर इथे येणाऱ्या ट्रेनमध्ये मालही वाहून नेला जातो. या राज्यातल्या लोकांना खरोखरच रेल्वेने प्रवास करण्याआधी बराच खडतर प्रवास करावा लागतो. कारण या राज्यात इतर कुठलेही रेल्वे स्थानक नसल्याने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना बैराबी शहरातील रेल्वे स्थानकावर यावं लागतं.
बैराबी रेल्वे स्थानकावर फारच कमी सुविधा उपलब्ध आहेत. 2016 साली या स्थानकाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. त्याआधी हे स्थानक खूपच लहान होते. आता या स्थानकावर गाड्यांची ये-जा करण्यासाठी चार रेल्वे रूळ आहेत. हे स्थानक 84 किलोमीटर दूर असलेल्या आसाममधील कटाखल जंक्शनशी जोडलेले आहे. सध्या भारतीय रेल्वेने मिजोरम येथे आणखी एक रेल्वे स्थानक तयार करण्यात यावे यासाठी प्रस्तावही मांडला आहे.
Join Our WhatsApp Community