आगामी काळात लवकरच होणार असलेल्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिला आमदारांना स्थान मिळावे, असा आग्रह पक्षाकडे धरला असून आणि पक्षानेही याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी दावा केला आहे.
महिला आघाडीच्या बैठकीला उपस्थिती
महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघ कोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांची त्यांनी रविवारी भेट घेतली. भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, वाघ म्हणाल्या, पक्षात महिलांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. आगामी निवडणुकातही महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील. आजही विधानसभा आणि विधानपरिषदेत पक्षाच्या सर्वाधिक महिला आमदार आहेत, त्या उत्तम काम करतील.
मणिपूरची घटना ही विकृती
मणिपूर येथील घटनेविषयी त्या म्हणाल्या, ही विकृती आहे, ती वेळीच ठेचली पाहिजे. परंतु ज्या प्रकारे विरोधक या प्रकरणाचे राजकारण करतात ते निंदाजनक आहे. माल्हा, राजस्थानमध्येही असेच प्रकार घडले, त्यावर कोणीही आवाज का उठवला नाही असा सवाल त्यांनी केला. किरिट सोमय्यांच्या बाबतील जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याची चौकशी सुरु आहे. परंतु ज्या ज्या महिलेला त्रास झाला ती समोर आलेली नाही, तिने संपर्क साधावा, असे आवाहन वाघ यांनी केले.
पक्ष सोडण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली
फुटलेल्या राष्ट्रवादी पक्षाविषयी त्या म्हणाल्या, हे नवीन नाही. मी 2019 मध्ये पक्ष सोडला, इतरांनी आता सोडला. कार्यकर्त्याला त्याचा पक्ष सोडताना दु:खच होत असते. पण ते सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण केली जाते. भाजपमध्ये नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला जी संधी दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे.
Join Our WhatsApp Community