राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असून त्यानंतर त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अजित पवार यांच्या गटाने मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनाही मंत्रिपदाचे आश्वासन देऊन गळाला लावण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत प्रवेश आणि मंत्रिपदाचा तपशील ठरवण्यात आला. त्यानुसार जयंत पाटील यांना सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले जलसंपदा खाते दिले जाणार आहे. जयंत पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढील सोपस्कार पार पडणार आहेत.
२ जुलैला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना कॅबिनेट मंत्रिपद आणि खाती देण्यात आली. त्यानंतर दादा गटाने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून अनुक्रमे शरद पवार, जयंत पाटील यांना बाजूला केले आहे. हे करताना दादा गटाने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार तर प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. या सर्व घडामोडीनंतरही जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. तसेच विधानसभेत विरोधी बाकांवर बसले.
मात्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या गटाला गळती लागली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर सुरुवातीला शरद पवार यांचे समर्थन करणाऱ्या डॉ. राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, किरण लहामटे यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनीही अजित पवार गटात सहभागी होण्याची मानसिकता केली असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार ते लवकरच अजित पवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेणार आहेत.
(हेही वाचा – ‘एनडीआरएफ’चा बेसकॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार)
अजित पवार यांना पाठिंबा देण्यामागे चिरंजीव प्रतीकचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा जयंत पाटील यांचा हेतू असल्याचे समजते. पाटील हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मुलगा प्रतीक हा राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे. सुरुवातीला जयंत पाटील यांनी प्रतीकसाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली. मात्र राजकीय समीकरण बदलल्याने पाटील यांनी जत विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. आघाडी सरकारमध्ये जलसंपदामंत्री असताना जयंत पाटील यांनी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. आता विधानसभा निवडणुकीला जेमतेम सव्वा वर्ष बाकी असताना पाटील यांना सत्तेत जाण्याचे वेध लागले आहेत. शिंदे सरकारमध्ये जलसंपदा खाते घेऊन पुन्हा जतकडे लक्ष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर हा पारंपरिक मतदारसंघ मुलगा प्रतीकसाठी सोडून जयंत पाटील हे जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत.
…कोणीही गैरसमज निर्माण करू नका – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना, मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम आहे. कोणीही गैरसमज निर्माण करू नका असे जयंत पाटील यांनी सांगितले. खासदार सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे. विधीमंडळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकांना भेटू शकतो. आमचे व्यक्तिगत संबंध असू शकतात त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेच कारण नाही. माझे इतर पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे मात्र याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी शरद पवार साहेबांसोबत ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहे. पवार साहेब सांगतील तीच आमची दिशा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community