वंदना बर्वे
मणिपूर प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवार, २४ जुलै या तिसऱ्या दिवशी सुध्दा होऊ शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेवर वक्तव्य द्यावे या मागणीवर विरोधक अडून आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन तीन दिवस उलटले आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून संसदेत कामकाज होऊ शकले नाही. मणिपूर प्रकरणावर सभागृहात नियम २७६ अंतर्गत चर्चा व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य द्यावे या दोन मागण्यांवर विरोधक अडून बसले आहेत.
तर दुसरीकडे, सरकार कलम १६७ अंतर्गत चर्चा करण्यास तयार आहे. शिवाय, गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री सभागृहात वक्तव्य देतील अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, विरोधकांचा यास नकार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी सकाळी ११ वाजता सुरू झाले. मात्र, विरोधकांनी आपली मागणी रेटून लावल्यामुळे कार्यवाही १२ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. यानंतर दोन वाजेपर्यंत आणि नंतर अडीच वाजेपर्यंत अशा दोन वेळा कामकाज पुढे ढकलण्यात आले. दोन्ही सभागृहाचे कामकाज तीन वाजता पुन्हा सुरू झाले. परंतु, गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले.
(हेही वाचा – कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; PF वर व्याजदर वाढणार)
लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मणिपूरमधील परिस्थितीबाबत विरोधी पक्षांनी संसदेत संयुक्तपणे निदर्शने केली. तर, केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांनीही अनेक राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून आज संसदेतील गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. मणिपूर मुद्द्यावर संसदेत चर्चा होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान करावे, अशी मागणी विरोधक करत आहेत, तर सरकार या विषयावर पंतप्रधान मोदी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलतील, असा आग्रह धरत आहेत.
संसदेतील गतिरोध दूर करण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेतला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय आणि द्रमुक नेते टीआर बालू यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संसदेतील गतिरोधावर दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशीही उपस्थित होते. शाह म्हणाले, “मी सभागृहात यावर चर्चा करण्यास तयार आहे. मी विरोधकांना विनंती करतो की, या मुद्द्यावर चर्चेला परवानगी द्यावी. देशाला या संवेदनशील विषयावरील सत्य माहित असणे महत्त्वाचे आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community