यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील पूर्व व पश्चिम असे दोन्ही द्रुतगती महामार्ग आणि इतरही सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी अनेक उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात आल्या आहेत. रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. यंदा १ एप्रिल ते २४ जुलै २०२३ या कालावधीत महानगरपालिकेने विविध रस्त्यांवर मिळून सुमारे ६ हजार ४५ खड्डे बुजवले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. सुमारे ११ हजार ३८ चौरस मीटर क्षेत्रफळाची खड्डयांची जागा विविध प्रकारच्या तंत्राद्वारे बुजवले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या सर्व विभागात तातडीने खड्डे भरण्यासाठीच्या उपाययोजना अतिशय चोखपणे पार पाडण्यात येत आहेत. मुंबईतील द्रुतगती महामार्गासह सर्व रस्त्यांवर खड्डे आढळल्यास ते तातडीने भरण्यासाठी संपूर्ण मुंबईत यंत्रणा कार्यरत आहे. मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेणारा पाहणी दौरा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी रविवारदिनांक २३ जुलै २०२३ रोजी केला. मुंबई महानगरात रस्ते देखभाल व दुरूस्तीसाठी झालेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच आवश्यक त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशदेखील दिले आहेत.
पश्चिम उपनगरात दक्षिण दिशेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हे अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्याच्या निमित्ताने यंदा झालेल्या कामांपैकी हे एक उत्तमरितीने झालेले असे काम आहे. काही ठिकाणी रस्ता दुभाजकांच्या ठिकाणी पाणी निचरा होण्याचा विषय असला तरीही रस्त्यांवरील खड्डे मात्र उत्तमरित्या बुजविण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाळापूर्व रस्ता दुरूस्तीचे झालेले काम कौतुकास्पद आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी गोदरेज परिसरात काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे तातडीने पूर्ण करण्यात यावे, त्याचप्रमाणे पूर्व उन्नत द्रुतगती महामार्गावरही काही ठिकाणी आढळलेले खड्डे वाहतूकीला अडथळा न होता लवकरात लवकर भरावेत, अशी सूचनाही या दौऱ्यात वेलरासू यांनी रस्ते विभागाला केली.
(हेही वाचा – बाबू गेनू मंडई, शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम ४६ महिन्यांनंतरही अपूर्णच)
दरम्यान, रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे केले जाते. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाज माध्यमे, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मुंबईतील इतर शासकीय प्राधिकरणांनी देखील आपापल्या अखत्यारितील रस्त्यांचे योग्य परिरक्षण करावे, खड्डे तातडीने बुजवावेत म्हणून देखील महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे. खड्डे भरण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करून तत्काळ वाहतूक पूर्ववत होईल, तसेच नागरिकांची पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनादेखील वेलरासू यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगरात सुमारे २०५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी १ हजार ५८ किलोमीटर डांबरी तर ९९२ किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नित्य प्रक्रिया असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community