राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या कथित चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत. कुणीही अफवा पसरवू नये. यासंदर्भात अजित पवार यांनाही स्पष्टपणे सांगण्यात आले होते, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनातले मुख्यमंत्री प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरसले. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा म्हणजे वावड्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करणार आहे. शरद पवारांना मोदी-शहांकडून एनडीएत सामील होण्याची ऑफर म्हणजे अफवा असल्याचेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मांडली अधिकृत भूमिका
एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याची अधिकृत भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. एकनाथ शिंदेंसह 16 जण अपात्र ठरणार आहेत असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. एकनाथ शिंदेंसह 16 जण अपात्र झाल्यामुळे अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा चव्हाणांनी केला. ही शक्यता फडणीसांना फेटाळून लावली आहे. चव्हाण पतंगबाजी करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 10 ऑगस्टपर्यंत राज्यात बदल होतील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत. मात्र, असं काहीच होणार नसून झालाच तर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट म्हणजे निरोप समारंभ होता का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित केला आहे. उद्यापासून 10 ऑगस्टपर्यंत राज्यात बदल होतील, अशी राजकीय भविष्यवाणी त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community