राज्यात अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांवरुन आधीच महाविकास आघाडी टार्गेटवर असताना, संजय राऊत यांनी मात्र युपीए बचाओ मोहिमेला सुरुवात केल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांनी स्विकारावे, अशी सूचना संजय राऊत यांनी केली होती. आज पुन्हा एकदा आपली ती सूचना कायम असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या काँग्रेस विकलांग अवस्थेत आहे, त्यामुळे सध्या युपीएचे जुने दिवस परत आणण्यासाठी काँग्रेस बाहेरील नेत्याने युपीएचे नेतृत्त्व करणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. पण त्यांच्या या विधानावरुन काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्यावर नाराज झाले आहेत.
काय म्हणाले राऊत?
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना, युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांनी विराजमान व्हावे, ही माझी सूचना कायमच असणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. आणि यावरुन काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाही. युपीए अधिक मजबूत होण्याची सध्या गरज आहे, अशी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची मागणी आहे. हीच भूमिका खुद्द सोनिया गांधींची सुद्धा आहे. त्यांनी प्रदीर्घ काळ युपीएचे नेतृत्त्व खंबीरपणे केले. पण सध्या त्यांची तब्येत बरी नाही. देशातल्या घडामोडी बदलत आहेत. त्यामुळे असा वेळी युपीएचे नेतृत्त्व काँग्रेस बाहेरच्या नेत्याने करावं, अशी सगळ्यांचीच मागणी आहे. सध्या काँग्रेस विकलांग अवस्थेत आहे, त्यामुळे युपीएला शरद पवारांसारख्या नेतृत्त्वाची गरज आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले.
(हेही वाचाः देशमुखांनीही लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र! म्हणाले आता होऊनच जाऊद्या…)
शिवसेनेला अधिकार नाही
राऊतांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना पक्ष हा युपीएचा भाग नाही, त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा किंवा मत नोंदवण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे नानांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवर तितका मोठा पक्ष नाही, त्यामुळे युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचा प्रश्नच येत नाही, असे काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या युपीए बचाओ मोहिमेवर काँग्रेस नेत्यांनी मात्र जोरदार टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community