Kargil Vijay Divas : अवघ्या ६० दिवसांतच पाकड्यांना हरवले; जाणून घ्या कारगिल लढाईचे महत्व

165

कारगिल दिवस हा आपल्या भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि भारताची मान उंचावणारा दिवस आहे. भारतात कारगिल दिवस २६ जुलै रोजी साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली घमासान युद्ध झाले होते. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण ६० दिवस चालले. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. आणि अखेर पाकिस्तानने शरणागती पत्कारली. युद्धावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावले. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा अविस्मरणीय विजय झाला. कारगिल विजय दिवस हा दरवर्षी युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

युद्धात ५५० जवान शहीद, १ हजार ४०० च्या आसपास जवान जखमी

सुरुवातीला पाकिस्तानची ही एक घुसखोरी आहे आणि काही दिवसांत पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढले जाईल असे वाटत होते. मात्र नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि घुरखोरांच्या नियोजित रणनितीचा मागोवा घेतल्यानंतर हा मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा अंदाज भारतीय लष्कराला आला. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ऑपरेशन विजयची आखणी केली. २ लाख सैनिकांना सीमारेषेवर पाठवले गेले. हे युद्ध सलग ६० दिवस चालले आणि अखेर २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानला हरवत या युद्धात विजय मिळवला. या विजयात हवाई दलाचाही मोठा वाटा आहे. कारगिलच्या युद्धात साडे पाचशे जवानांना वीरमरण आले तर १ हजार ४०० च्या आसपास जवान जखमी झाले होते.

(हेही वाचा Population : लोकसंख्येत चीन नंबर वन; 1 जुलैला भारताची लोकसंख्या 139 कोटी)

पाकिस्तानकडून माघार घेण्याचाही प्रयत्न

कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचा हात होता ही गोष्ट पाकिस्तान नेहमी आणि आजही नाकारत आला आहे. पण या युद्धानंतर समोर आलेल्या अनेक पुराव्यांतून पाकिस्तानी लष्कराने घुसखोरांना मोठी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ युद्धात काही मदत मिळावी यासाठी अमेरिकेलाही गेले होते. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.