Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन फायर रोबोट

335
Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन फायर रोबोट
Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन फायर रोबोट

सचिन धानजी, मुंबई

मुंबई अग्निशमन दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फायर रोबोटचा उपयोग करून आग विमोचनाचे कार्य केले जात आहे. या फायर रोबोटच्या यशस्वी वापरानंतर आता अग्निशमन दलाच्यावतीने आणखी दोन फायर रोबोटची खरेदी केली जात असून लवकरच हे फायर रोबोट अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या एक फायर रोबोट भायखळा येथील अग्निशमन केंद्रात असून त्यांच्या आवश्यकतेनुसार आगींच्या वर्दींवर या रोबटचा वापर केला जात आहे. यासाठी अग्निशमन दलाच्यावतीने निविदा मागवून आणखी दोन रोबोटची खरेदी प्रक्रिया राबवली होती. या खरेदी प्रक्रियेमध्ये पाच वर्षांच्या देखभालीसाठी या दोन्ही रोबोटसाठी विविध करांसह ७ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या फायर रोबोटच्या पुरवठ्यासाठी श्री ललिता या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या फायर रोबोटचा पुरवठा केल्यानंतर दोन वर्षांचा हमी कालावधी असेल आणि त्यानंतर त्याच कंपनीला पाच वर्षांची देखभालीची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या देखभालीसाठी ३८ लाख रुपये मोजले जाणार आहेत, तर या दोन्ही फायर रोबोटची खरेदी ही ७ कोटी ०८ लाखांमध्ये केली जाणार आहे.

(हेही वाचा – गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगीसाठी १ ऑगस्टपासून स्वीकारणार अर्ज)

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारख्या परिस्थितीमध्ये अग्निशामकांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. तसेच मुंबईमध्ये असलेले पेट्रोकेमिकल कारखाने आणि अणुऊर्जा संशोधन केंद्र याठिकाणी आगीच्या दुघर्टना घडल्यास अग्निशमनाचे कार्य फारच धोकादायक असते. अशा परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्यान फायर रोबोटचा वापर केला जात असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन फायर रोबोट ताफ्यात आल्यास शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येक फायर रोबोटचा वापर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत अशाप्रकारे अनेक जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतीत आग लागल्यास, त्या इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या जुन्या इमारतींमध्ये लागल्यास तेथील धोका लक्षात घेता या रोबोटचा वापर करता येऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फायर रोबोटचा उपयोग करून अग्निशमन कार्य करता येते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१९मध्ये प्रथम फायर रोबोट खरेदी करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.