मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. मी सांगतो आहे ही मोदीची गॅरंटी आहे असं वक्तव्य बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रगती मैदानातील कनव्हेंशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या वास्तूचं नाव भारत मंडपम असं ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच विजयाचा दावा केला आहे. तसंच आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहे असंही म्हटलं आहे.
आज भारत मंडपमचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांचे आभार मानले ज्यांनी कोरोना काळात भारत मंडपम ही वास्तू बांधून पूर्ण केली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगील विजय दिवसाचाही उल्लेख केला. आज कारगील विजय दिवस आहे. देशाच्या शत्रूने जे दुःसाहस दाखवलं होतं त्याला आपल्या लष्करातल्या वीरांनी सडेतोड उत्तर दिलं होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २०१४ ला जेव्हा जनतेने आमच्या हाती (भाजपा) देशाचा कारभार दिला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमाकांवर होती. आमच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत हा देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. मी आता हे ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे सांगतो आहे फक्त गप्पा म्हणून नाही. मी हे आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचं नाव असेल. ही मोदीची गॅरँटी आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहू शकेल. तसंच आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचा विकासरथ हा अधिक वेगाने धावेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
(हेही वाचा Heavy Rain : मुंबईत रेड अलर्ट; शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी)
Join Our WhatsApp Community