काळबादेवी, मुंबादेवी, लोहार चाळ, क्रॉफर्ड मार्केट, दवा बाजार या परिसरात बेकायदेशीररित्या वाहनतळ चालविणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. वाहतूक पोलिसांनी या बेकायदेशीर वाहनतळावर पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाई नंतर, दक्षिण मुंबईतील बेकायदेशीर वाहनतळ चालविणाऱ्या चार जणांविरुद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात फसवणूक आणि वाहतूक नियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिराबाजार येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असणारे सुरेंद्र यादव हे चिरा बाजार येथील व्हीग्रास स्ट्रीट येथे असणाऱ्या वाहनतळवर आपली वाहने पार्क करीत होते. वाहन पार्किंगसाठी यादव हे मोहन लोकरे याला पार्किंगचे पैसे देत होते. यादव यांच्यासह इतर व्यापारी तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक देखील या ठिकाणी वाहने पार्क करून लोकरे यांना पार्किंगचे पैसे देत होते. दरम्यान, यादव यांच्यासह अनेक वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून ‘नो पार्किंग’ मध्ये वाहने उभी केल्यामुळे दंड आकारण्यात आला. सुरेंद्र यादव यांनी काळबादेवी वाहतूक पोलीस विभाग या ठिकाणी धाव घेऊन जाब विचारला असता ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्यात आले त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अधिकृत वाहनतळ नसल्याचे सांगण्यात आले.
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसाठी पुढील १२ तास महत्वाचे; पुन्हा रेड अलर्ट)
असाच काहीसा प्रकार बाबू गेनू रोड आणि विठ्ठलदास रोड लोहार चाळ काळबादेवी या ठिकाणी समोर आला. या दोन ठिकाणी बेकायदेशीर वाहन पार्किंग चालविण्यात येत होते. प्रशांत शेटे, अनिल उर्फ फारुख, शंकर गोविंद स्वामी तेवर हे या परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंग उघडून बसले होते. वाहन चालकाकडून दीडशे ते पाचशे रुपये पार्किंगचे पैसे घेऊन वाहने पार्क करून घेत होते. वाहन चालकांनी पार्किंगची पावती मागितल्यावर पावतीची गरज नाही असे सांगितले जात होते. लोहार चाळ आणि बाबू गेनू रोड या ठिकाणी बेकायदेशीर वाहन पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकरणी या वाहन चालकांनी लो. टी मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेकायदेशीर वाहन पार्किंग चालविणाऱ्यांवर पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून हे बेकायदेशीर पार्किंग उध्वस्त करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community