दिवसभर पाऊस, मनात भीती, मात्र मुंबईचे जनजीवन सुरळीत

192
दिवसभर पाऊस, मनात भीती, मात्र मुंबईचे जनजीवन सुरळीत
दिवसभर पाऊस, मनात भीती, मात्र मुंबईचे जनजीवन सुरळीत

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर पावसाची संततधार कायमच होती, परंतु ज्याप्रमाणात मुंबईत अतिवृष्टी होण्याची भीती वर्तवली जात होती तसा काही अतिमुसळधार पाऊस मुंबईत पडला नाही. वातावरण ढगाळ आणि त्यातच पावसाची संततधार यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असला तरी प्रत्यक्षात दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाला १०० मि. मीचाही पल्ला करता आला नव्हता. मात्र, कुठेही मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले असून ज्या भागांमध्ये पाणी तुंबले होते, तेथील पाण्याचाही निचरा योग्यगतीने झाल्याने या पावसाने मुंबईकरांना घाबरवले असले तरी प्रत्यक्षात पाणी तुंबण्याचे प्रकार कुठेही न झाल्याने लोकांच्या मनातील महापालिकेवरील विश्वास आता दृढ होताना दिसत आहे.

ठाण्यातील शाळांना सुट्टी

ठाण्यातील शाळांना २८ जुलै रोजीही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाण्यातील पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना महापालिकेनेने सुट्टी जाहीर केली. दुपारी दोन वाजेपर्यंत हा रेड अलर्ट असला तरी प्रत्यक्षात पावसाची दिवसभर हजेरी असूनही आणि सकाळी साडेसहा वाजता ३.३१ मीटरची भरती असतानाही काही परंपरागत सखल भाग वगळता कुठल्याही भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नाही. सर्व सब वे हे पूरमुक्त असे पहायला मिळत होते. त्यामुळे अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात पाणी तुंबण्याचे किंवा दुर्घटना घडण्याचे कोणतेही प्रकार घडले नाही. दिवसभर पाऊस पडूनही तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होती. पश्चिम रेल्वेवर नायगाव ते भाईंदर दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने काहीसा परिणाम झाला होता, परंतु त्यानंतर वाहतूक सुरळीत होती. भारतीय हवामान खाते (मुंबई) च्या आकडेवारीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबई शहरात ८३.२३ मि. मी, पूर्व उपनगरे ६२. ७२ मि. मी आणि पश्चिम उपनगरे ९५.०१ मि. मी एवढ्या पावसाची नोंद झाली. तर पुढील २४ तासांमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत दिवसभरात १५ झाडे कोसळली

मुंबईत सकाळपासून दिवसभरात शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये प्रत्येकी ४ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ७ झाडे उन्मळून पडण्याचे तथा त्यांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना आहे. या झाडे पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित तथा वित्त हानी झाली नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तर दिवसभरात शॉटसर्कीटच्या १३ घटना घडल्या असून त्यामध्ये पश्चिम उपनगरांत सात आणि शहरात ५ व पूर्व उपनगरांतील एका घटनेचा सामावेश आहे. याशिवाय सात ठिकाणी घरे तथा भिंती पडण्याच्या घटना घडल्या. त्यात पूर्व उपनगरांत दोन घटना घडल्या असून त्यात एक जण जखमी झाला आहे. तर शहरात पाच आणि पश्चिम उपनगरांत एक घटनेचा सामावेश आहे.

(हेही वाचा – Terrorist : काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची भरती करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; PHD स्कॉलरसह तिघांना अटक)

सायंकाळी सहा वाजेपर्यंत पडलेला पाऊस

शहर भाग – 

कुलाबा : १०३ मि. मी

फोर्ट परिसर : १०१ मि. मी

परळ : ९९ मि. मी

दादर : ९६ मि. मी

भायखळा : ९६ मि. मी

पूर्व उपनगर

मुलुंड : ७७ मि. मी

गव्हाणपाडा : ७२ मि. मी

भांडुप: ७१ मि. मी

विक्रोळी : ६६ मि. मी

पश्चिम उपनगरे

दहिसर : १८५ मि. मी

बोरीवली : १४७ मि. मी

कांदिवली : १३३ मि. मी

चिंचोली : १०६ मि. मी

मालाड मालवणी : १०५ मि. मी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.