तळ कोकणात राणेंचा दबदबा पुन्हा वाढला, शिवसेनेला लागली ‘घरघर’!

शिवसेनेची तळ कोकणात इतकी ताकद असतानाही सध्या शिवसेनेला तिथे घरघर लागली की काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

167
नारायण राणे… महाराष्ट्राराचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे विद्यमान खासदार आणि फायरब्रँड नेते. राज्यातील याच फायरब्रॅंड नेत्याचा आता पुन्हा एकदा दबदबा पहायला मिळत आहे. शिवसेनेवर आपल्या राणे स्टाईलमध्ये प्रहार करणारे राणे सर्वांनाचा माहीत आहेत. मात्र आता राणेंनी आणि त्यांच्या मुलांनी तळ कोकणात शिवसेनेला एकावर एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आधी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला तळ कोकणात पाणी पाजल्यावर, आता जिल्हा परिषदेवर देखील शिवसेनेला धक्का देत पुन्हा एकदा कोकणात राणे पॅटर्नचा चालतो, हे दाखवून दिले आहे.

कोकणात राणेंमुळे भाजपला अच्छे दिन

तळ कोकणात भाजप बोटावर मोजण्याइतकी शिल्लक राहिली होती. एक तर राणे आणि दुसरीकडे शिवसेना असे समीकरण तळ कोकणात पहायला मिळत होते. मात्र राणेंनी भाजमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तळ कोकणात भाजपला अच्छे दिन आले असून, राणेंनी स्वत:च्या जोरावर तिथे भाजपला अच्छे दिन आणले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला धक्का देत जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांना निवडून आणले. राणे समर्थक संजना सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ३० विरुद्ध १९ अशा फरकाने पराभव केला.

खासदार, पालकमंत्री, आमदार असूनही सेनेला घरघर

राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. एवढेच नाही तर कुडाळ-मालवण आणि सावंतवाडीतील आमदार तसेच खासदार देखील शिवसेनेचा आहे. मात्र शिवसेनेची तळ कोकणात इतकी ताकद असतानाही सध्या शिवसेनेला तिथे घरघर लागली की काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे फक्त देवगड-कणकवली वगळता शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघामध्ये देखील सध्या नारायण राणे यांची ताकद वाढताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेत राणेंनी ही ताकद दाखवून दिली आहे.

दिपक केसरकर शिवसेनेवर नाराज?

माजी गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रीपद मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे ते सध्या शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू आहे. एवढेच नाही तर ते पक्षात आणि पक्षाच्या कार्यक्रमात देखील सक्रिय नसल्याचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे फक्त कुडाळ-मालवण वगळता अस्तित्व दिसत नाही. खासदार विनायक राऊत हे देखील रत्नागिरी आणि मुंबईत असतात त्यामुळे तळ कोकणातील शिवसेनेची पकड सुटत चाचल्याचे काही जाणकार सांगत आहेत.

राणेंचा दबदबा वाढणार

दुसरीकडे नारायण राणे यांनी स्वत: तळ कोकणात लक्ष घातले असून, त्यांचे दोन्ही चिरंजीव आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे देखील सध्या तळ कोकणात ठाण मांडून बसले आहेत. निलेश राणे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले दौरे सुरू केले आहेत. तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या देवगड-कणकवलीत आपला दबदबा निर्माण केला आहे. तिन्ही राणेंनी सध्या कोकणात लक्ष केंद्रीत केल्याने आता राणे समर्थक देखील कामाला लागले असून, भविष्यात याचा फायदा होऊन पुन्हा एकदा या विधानसभा मतदार संघात राणेंचा दबदबा पहायला मिळाला, तर नवल वाटायला नको.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.